निष्ठावंत ‘भिम सैनिक’ शंकरराव पोहरकार काळाच्या पडद्याआड.
निष्ठावंत 'भिम सैनिक' शंकरराव पोहरकार काळाच्या पडद्याआड.
निष्ठावंत ‘भिम सैनिक’ शंकरराव पोहरकार काळाच्या पडद्याआड.

तेल्हारा (जि. अकोला), दि.३-तेल्हारा शहरातील मिलिंद नगर येथील आंबेडकरी चळवळीच्या पहिल्या पिढीतील खंदे आणि झुंजार नेते शंकर रावजी पोहरकार यांचे वयाच्या ८५व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये बुधवार, दि. ३ जून रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरासह आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असून एक निष्ठावंत ‘निळा सैनिक’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचेवर पंचक्रोशीतील मोठा जनसमुदाय व आप्तेष्ट,नागरिक यांच्या उपस्थितीत तेल्हारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आयुष्यभर गरिबीशी दोन हात करत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. ते केवळ एक कार्यकर्ते नव्हते, तर परिसरातील आंबेडकरी जनतेचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते.
शंकर रावजी पोहरकार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि प्रामुख्याने रा.सु. गवई यांच्या नेतृत्वाखालील आणि दलित पँथर चळवळीच्या काळात आक्रमक आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नामांतरमध्ये सहभागी होते. जेल भरो आंदोलने दलितांवर होणारे अन्याय-अत्याचार आणि हक्कांच्या लढाईसाठी त्यांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले. चळवळीच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा जेल भरो आंदोलनात भाग घेतला आणि तुरुंगवासही भोगला. शेवटच्या टप्प्यापर्यंत १४ एप्रिल (आंबेडकर जयंती), बुद्ध पौर्णिमा, विजयादशमी (धम्मचक्र प्रवर्तन दिन) आणि ६ डिसेंबर (महापरिनिर्वाण दिन) या प्रत्येक ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या दिवशी त्यांचा थरथरत्या आवाजातील, पण तरुणांना लाजवेल असा तडफदार आणि जोमदार आवाज सर्वांना प्रेरणा देत असे. त्यांनी आयुष्यभर केवळ निळा फेटा आणि निळी टोपी परिधान करून निळ्या रुबाबात खऱ्या आंबेडकरी विचारधारेचे पालन केले. त्यांच्या पश्चात त्यांचा मोठा आप्तपरिवार व चळवळीतील असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे.
