अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कोणी तरी आहे पाठिशी” यांची पत्रकारांना जाणीव करून देणारी संघटना.
अडचणीत सापडलेल्या पत्रकारांच्या पाठीशी आईच्या मायेने उभी राहणारी मातृसंस्था!
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कोणी तरी आहे पाठिशी” यांची पत्रकारांना जाणीव करून देणारी संघटना.अडचणीत सापडलेल्या पत्रकारांच्या पाठीशी आईच्या मायेने उभी राहणारी मातृसंस्था!

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद,
संघर्षाचा इतिहास, विश्वासाची परंपरा आणि पत्रकारांच्या हक्कांची चळवळ, 87 वर्षांची गौरवशाली परंपरा… पत्रकारांच्या हक्कांसाठी अविरत संघर्ष… माध्यम स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी खंबीर भूमिका… आणि अडचणीत सापडलेल्या पत्रकारांच्या पाठीशी आईच्या मायेने उभी राहणारी मातृसंस्था!
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची पहिली आणि सर्वांत मोठी पत्रकार संघटना म्हणून ओळखली जाते. 3 डिसेंबर 1939 रोजी मुंबईत स्थापन झालेल्या या संघटनेने गेल्या 87 वर्षांत केवळ पत्रकारांचे प्रश्न मांडलेत असं नाही, तर पत्रकारितेची प्रतिष्ठा, माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठीही मोलाचे योगदान दिले आहे. संघर्ष, संघटन, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारांप्रती असलेली आत्मीयता ही परिषदेची ओळख बनली आहे.
माध्यम स्वातंत्र्यासाठी ऐतिहासिक लढा
पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याबरोबरच माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीविरुद्ध परिषदेनं सातत्याने संघर्ष केला . बिहार सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात परिषदेनं देशातील पहिले आंदोलन आंदोलन उभारले. या लढ्यात परिषदेच्या 80 पत्रकारांनी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात 15 दिवसांचा तुरुंगवास भोगला. या आंदोलनाची धग देशभर पोहोचली आणि अखेर बिहार सरकारला माघार घ्यावी लागली.
आणीबाणीच्या काळातही तत्कालीन सत्तेच्या दबावाला न जुमानता परिषदेने वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. सत्ता कोणाचीही असो, पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा येत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवायचा, हीच परिषदेची परंपरा राहिली आहे.
आजही देशभर पत्रकारांवर हल्ले होतात, त्यांना धमकावले जाते, खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि त्यांचे आवाज दाबण्याचे प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातही पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. या अन्यायाविरुद्ध केवळ निवेदने देऊन न थांबता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भूमिका परिषदेनं कायम घेतली आहे.
*एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार हक्कांची प्रभावी चळवळ*
गेल्या 25 वर्षांत एस. एम. देशमुख यांच्या खंबीर, आक्रमक आणि धडाडीच्या नेतृत्वाखाली परिषदेने पत्रकारांच्या प्रश्नांना राज्यव्यापी चळवळीचे स्वरूप दिले. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात स्वतंत्र संरक्षण कायदा व्हावा, यासाठी परिषदेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या संघर्षामुळे महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला.. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.. या कायद्याचे जनकत्व एस.एम देशमुख यांच्याकडे जाते.. सततचा पाठपुरावा, सर्व संघटनांना एकत्र करून दिलेला लढा यातून हा कायदा जन्माला आला.. याचं श्रेय निश्चितपणे अ. भा. मराठी पत्रकार परिषद आणि एस.एम देशमुख यांनाच असले तरी
कागदोपत्री कायदा अस्तित्वात येणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आजही कायम असल्याची भूमिका परिषद सातत्याने मांडत आहे. पत्रकारांच्या संरक्षणासाठी केलेला कायदा प्रत्यक्षात प्रभावीपणे लागू व्हावा, दोषींवर कारवाई व्हावी आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, ही परिषदेची प्रमुख मागणी आहे.
माध्यम स्वातंत्र्याचा प्रश्न असो, पत्रकारांवरील हल्ले असोत किंवा पत्रकारांच्या मूलभूत हक्कांचा विषय असो, या प्रत्येक प्रश्नावर एस. एम. देशमुख आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची भूमिका जाणून घेणे सरकार दरबारी देखील आवश्यक मानले जाते. एखाद्या संघटनेची ताकद केवळ तिच्या सदस्यसंख्येत नसते, तर तिच्या भूमिकेची दखल किती गांभीर्याने घेतली जाते, यातही असते. या कसोटीवर परिषदेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
*पत्रकारांच्या कल्याणासाठी निर्णायक प्रयत्न*
पत्रकारितेतील अनिश्चितता, आर्थिक अडचणी, आरोग्यविषयक समस्या आणि निवृत्तीनंतरच्या जगण्याचे प्रश्न हे पत्रकारांसमोरील वास्तव आहे. या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता त्यावर ठोस उपाययोजना व्हाव्यात, यासाठी परिषदेनं सातत्याने प्रयत्न केले आहेत.
महाराष्ट्रात पत्रकार पेन्शन योजना सुरू व्हावी, यासाठी परिषदेने दीर्घकाळ पाठपुरावा केला, लढा दिला . पत्रकार आरोग्य योजनेच्या निर्मिती आणि विस्तारासाठीही परिषदेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आज ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे, तसेच आजारपणाच्या काळात त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. परिषदेच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रात पेन्शन योजना सुरू झाली असली तरी राज्यातील असंख्य गरजू पत्रकारांना या योजनेचा आजही लाभ मिळत नाही.. कारण नियम असे आहेत, बहुसंख्य पत्रकारांना पेन्शन मिळूच शकत नाही.. या विरोधात परिषद आता आवाज उठवत आहे, प्रसंगी कोर्टात जायची तयारीही परिषद करीत आहे..
पत्रकार पेन्शन योजनेतील जाचक अटी बदलून अधिकाधिक पात्र पत्रकारांना योजनेचा लाभ मिळावा अशी परिषदेची मागणी आहे.. पत्रकार सन्मान योजनेचा खऱ्या अर्थाने सन्मानपूर्वक लाभ मिळावा, पात्र पत्रकारांना तांत्रिक कारणांमुळे वंचित राहावे लागू नये आणि गरजू ज्येष्ठ पत्रकारांना न्याय मिळावा, आणि ही सन्मान योजना पत्रकार अपमान योजनेत परावर्तीत होऊ नये ही परिषदेची भूमिका आहे.
छोटी वृत्तपत्रे, ग्रामीण भागातील पत्रकार, अधिस्वीकृतीधारक होण्यासाठी प्रयत्न करणारे पत्रकार, तसेच स्थानिक आणि प्रादेशिक माध्यमांसमोरील आर्थिक व प्रशासकीय अडचणी हे विषयही परिषदेच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहेत. सरकारच्या दरबारात पत्रकारांचे प्रश्न मांडणे, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणे, हे परिषदेचे वैशिष्ट्य आहेत.
*अडचणीतल्या पत्रकारांसाठी मायेचा आधार*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेला पत्रकारांची मातृसंस्था म्हटले जाते. हे केवळ संबोधन नाही; तर परिषदेच्या कार्यातून सिद्ध झालेल्या नात्याचे प्रतीक आहे.
एखादा पत्रकार आजारी असतो, आर्थिक संकटात सापडतो किंवा कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवतो, तेव्हा त्याच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका परिषदेनं कायम घेतली आहे. गरजू आणि आजारी पत्रकारांना आर्थिक मदत देण्याच्या उपक्रमातून आतापर्यंत सुमारे 80 लाख रुपयांची मदत परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांवर आंदोलन करणारी संघटना म्हणून परिषद ओळखली जातेच; परंतु संकटाच्या काळात पत्रकारांना मदतीचा हात देणारी संस्था म्हणूनही तिची वेगळी ओळख आहे. संघर्षाच्या मैदानात खंबीरपणे उभे राहणे आणि दुःखाच्या क्षणी मायेने आधार देणे, या दोन्ही भूमिका परिषद तितक्याच आत्मीयतेने पार पाडते.
*कर्तृत्ववान पत्रकारांचा गौरव : कृतज्ञतेची परंपरा*
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नाही. समाजाचे प्रबोधन करणे, सत्तेला प्रश्न विचारणे, लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हे पत्रकारितेचे व्यापक स्वरूप आहे. अशा पत्रकारितेत आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणे, ही परिषदेची महत्त्वपूर्ण परंपरा आहे.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार हा याच कृतज्ञतेचा आविष्कार आहे.
दिनू रणदिवे, मा. गो. वैद्य, पंढरीनाथ सावंत, प्रकाश बाळ जोशी आणि मधुकर भावे यांसारख्या दिग्गज पत्रकारांना या पुरस्काराने सन्मानित करून परिषदेने त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. यंदा ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला विशेष आनंद होत आहे.
या पुरस्कारामागे केवळ एका व्यक्तीचा गौरव करण्याची भावना नाही, तर पत्रकारितेतील समृद्ध परंपरेचा सन्मान करण्याची आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याची व्यापक भूमिका आहे.
परिषदेच्या माध्यमातून विविध मान्यवरांनी दिलेल्या देणग्या आणि ठेवींमधून त्यांच्या नावाने पुरस्कार दिले जातात. यंदापासून हिंदी पत्रकारितेचे पितामह आणि कोकणातील पराड येथील बाबूराव पराडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांच्या नावाने हिंदी भाषिक पत्रकाराचा गौरव करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे. मराठी पत्रकारितेच्या परंपरेचा सन्मान करतानाच भारतीय पत्रकारितेतील व्यापक योगदानाची दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे.
*जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचा सन्मान*
पत्रकारितेची खरी ताकद केवळ महानगरांमध्ये नसते. गावागावांत, तालुक्यांत आणि जिल्ह्यांत प्रतिकूल परिस्थितीत काम करणारे पत्रकार लोकशाहीचा पाया मजबूत करतात. स्थानिक प्रश्नांना वाचा फोडतात, सामान्य माणसाच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवतात आणि समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकतात.
अशा पत्रकार संघटनांच्या कार्याची दखल घेऊन परिषद वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार प्रदान करते.
राज्याच्या विविध भागांत होणाऱ्या या गौरव सोहळ्यांतून स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पत्रकार संघटनांना प्रोत्साहन मिळते. पत्रकारितेतील सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक शिस्त आणि लोकाभिमुख कार्य यांचा गौरव करण्याची ही परंपरा परिषदेने जपली आहे.
*अधिवेशन : पत्रकारांच्या एकजुटीचा महोत्सव*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे द्वैवार्षिक अधिवेशन म्हणजे पत्रकारांच्या एकजुटीचा, विचारमंथनाचा आणि संघटनशक्तीचा मोठा महोत्सव असतो. आतापर्यंत परिषदेची 44 अधिवेशने झाली आहेत. यंदा एप्रिल महिन्यात उदगीर येथे पार पडलेल्या अधिवेशनात मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांतील हजारो पत्रकार सहभागी झाले.
तीन हजारांहून अधिक पत्रकारांची उपस्थिती, विविध माध्यमांचे प्रतिनिधित्व, पत्रकारांच्या प्रश्नांवरील चर्चा आणि संघटनात्मक बांधिलकी यांमुळे या अधिवेशनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र आणणारे, त्यांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे आणि त्यांच्या मनात एकजुटीची भावना दृढ करणारे हे अधिवेशन असते.
परिषदेची अधिवेशने ही केवळ औपचारिक संमेलने नसतात; ती पत्रकारांच्या हक्कांच्या चळवळीला नवी दिशा देणारी आणि संघटनशक्तीला नवे बळ देणारी व्यासपीठे असतात. म्हणूनच अधिवेशनात कोणते ठराव संमत होतात याकडे पत्रसृष्टीचे आणि सरकारचे विशेष लक्ष असते..
*विश्वविक्रम *
पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्नही परिषदेनं गांभीर्याने घेतला आहे. दरवर्षी 3 डिसेंबर या स्थापना दिनानिमित्त राज्यभर पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. एकाच दिवशी विविध जिल्ह्यांत होणाऱ्या या उपक्रमांतून हजारो पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी केली जाते.
कामाचा ताण, अनियमित दिनक्रम, सततचा प्रवास आणि व्यावसायिक असुरक्षितता यांचा पत्रकारांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पत्रकारांना आवश्यक वैद्यकीय सल्ला मिळवून देणे, हे या उपक्रमाचे महत्त्व आहे.
संघटना म्हणून पत्रकारांचे हक्क जपतानाच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, ही परिषदेच्या कार्याची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे.
*महाराष्ट्राच्या सीमापार*
मुंबईत स्थापन झालेल्या या संघटनेचा प्रवास आता 87 वर्षांचा झाला आहे. या काळात परिषदेची व्याप्ती सातत्याने वाढत गेली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरांसह महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 354 तालुक्यांमध्ये परिषदेचे संघटनात्मक जाळे विस्तारले आहे. महाराष्ट्राबरोबरच दिल्ली आणि शेजारील राज्यांतही परिषदेच्या शाखा आणि संपर्काचे जाळे निर्माण झाले आहे.
आज सुमारे 12 हजार पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत.. देशातील ही एकमेव पत्रकार संघटना आहे की, जीच्या सदस्यांची संख्या एवढी प्रचंड आहे.. ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत, छोट्या वृत्तपत्रांपासून मोठ्या माध्यमसमूहांपर्यंत आणि मुद्रित माध्यमांपासून डिजिटल पत्रकारितेपर्यंत विविध स्तरांतील पत्रकारांना एकत्र आणण्याचे काम परिषद करते.पत्रकारिकेतील बदलते प्रवाह लक्षात घेऊन परिषदेने डिजिटल मधील पत्रकारांसाठी डिजिटल मिडिया परिषद ही स्वतंत्र विंग तयार केली आहे.. 28 जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू झाल्या आहेत.. डिजिटल पत्रकारांना सरकारी मान्यता मिळावी, त्यांना अधिस्वीकृती आणि अन्य पत्रकारांना मिळणाऱ्या सर्व सवलती मिळाव्यात यासाठी परिषद आग्रही आहे..
परिषदेने महाराष्ट्रव्यापी पत्रकार हक्कांची चळवळ उभी केली आहे. त्यामुळे पत्रकारांच्या मनात एक महत्त्वाचा विश्वास निर्माण झाला आहे—आपण एकटे नाही आहोत . आपल्या प्रश्नांसाठी लढणारी, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणारी आणि संकटाच्या वेळी आपल्या पाठीशी उभी राहणारी एक भक्कम संघटना आपल्यासोबत आहे याची जाणीव महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये निर्माण झाली आहे.. परिषदेची ही मोठी फलश्रुती आहे..
हा विश्वासच परिषदेची खरी संपत्ती आहे.
*मर्यादित साधने, पण संघर्षाची अमर्याद ताकद*
परिषदेकडे उत्पन्नाचे कोणतेही मोठे स्वतंत्र साधन नाही. सदस्यांकडून मिळणारे शुल्क आणि संलग्नता शुल्क यांच्या माध्यमातून संघटनेचा कारभार चालतो. आर्थिक साधने मर्यादित असली, तरी पत्रकारांच्या प्रश्नांवर भूमिका घेताना परिषदेने कधीही मर्यादित दृष्टिकोन स्वीकारलेला नाही.एस. एम देशमुख यांनी कायम स्पष्ट, निर्भिड आणि कणखर भूमिका घेत परिषदेला वैभवावर नेऊन ठेवले आहे..
गेल्या 25 वर्षांत एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेने अनेक प्रश्नांवर प्रभावी, आक्रमक आणि प्रसंगी निर्णायक भूमिका बजावली आहे. सातत्यपूर्ण पाठपुरावा, पत्रकारांना एकत्र आणण्याची क्षमता, संघर्षासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करण्याची वृत्ती यांमुळे परिषदेने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
माध्यम स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला की परिषदेची भूमिका काय आहे, याकडे शासन आणि समाजाचे लक्ष जाते. एखाद्या संघटनेची विश्वासार्हता तिच्या आर्थिक साधनांवर नव्हे, तर तिच्या भूमिकेतील ठामपणा आणि कार्यातील सातत्यावर ठरते. परिषदेचा प्रवास याची साक्ष देतो.
*दिग्गज संपादकांच्या विचारांचा वारसा*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या 87 वर्षांच्या प्रवासामागे अनेक दिग्गज संपादक, विचारवंत आणि पत्रकारांचे योगदान आहे. संस्थेचे पहिले अध्यक्ष काकासाहेब लिमये यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा अनेक मान्यवरांनी समृद्ध केली.
नवाकाळकार य. कृ. खाडीलकर, दा. वि. गोखले, श्री. शं. नवरे, पा. वा. गाडगीळ, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, प्रभाकर पाध्ये, बाळासाहेब भारदे, ह. रा. महाजनी, अनंत भालेराव, तरुण भारतकार बाबूराव ठाकूर, अनंतराव पाटील, दादासाहेब पोतनीस, वसंतराव काणे, रंगाअण्णा वैद्य आणि एस.एम. देशमुख यांसारख्या दिग्गजांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.
या मान्यवरांनी संस्थेला दिलेला वैचारिक वारसा, संघटनात्मक दिशा आणि पत्रकारितेच्या मूल्यांप्रती असलेली निष्ठा ही आजही परिषदेच्या वाटचालीची प्रेरणा आहे. पूर्वसुरींनी दाखवलेल्या मार्गावरून चालताना काळानुरूप बदलणाऱ्या पत्रकारितेच्या प्रश्नांशी दोन हात करण्याची तयारी परिषदेनं कायम ठेवली आहे.
*शतकाकडे वाटचाल : परंपरेचा अभिमान, भविष्याची जबाबदारी*
आणखी 13 वर्षांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर पोहोचेल. एखादी संस्था जवळपास शंभर वर्षे आपले अस्तित्व टिकवते आणि बदलत्या काळात आपली कार्यक्षमता आणि संघर्षाची धार कायम ठेवते, ही निश्चितच महत्त्वाची बाब आहे.
यामागे पूर्वसुरींचे योगदान, पत्रकारांचे प्रेम, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि संस्थेच्या ध्येयावरील अढळ विश्वास आहे. परिषदेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक आव्हाने आली; त्याला परिषदेनं समर्थपणे तोंड दिले.. कोर्ट कचेऱ्या करण्यात परिषदेची मोठी ताकद वाया गेली, आर्थिक भार पडला..मात्र काही नतद्रष्टांनी निर्माण केलेल्या प्रत्येक आव्हानांचा परिषदेने समर्थपणे सामना केला.. परिषद ना कोणापुढे झुकली, ना कधी थकली.. परिषदेनं उभी केलेली चळवळ एस.एम. देशमुख यांनी अखंडपणे सुरू ठेवली.. हे करताना त्यांना मोठी झळ बसली, दोन नोकऱ्या सोडव्या लागल्या, खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला मात्र एस.एम. यांनी परिणामाचा कधीही विचार न करता परिषदेचं हीत डोळ्यासमोर ठेवून परिषदेला वाहून घेतले.. बोलायचे म्हणून नाही, पण एस.एम. देशमुख यांच्यासारखे समर्थ नेतृत्व ही परिषदेची ताकद आणि पुंजी आहे हे कोणीही विसरू नये..
काळ बदलला, माध्यमांचे स्वरूप बदलले, पत्रकारितेसमोरील प्रश्न बदलले. मात्र पत्रकारांच्या हक्कांसाठी लढण्याची आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची परिषदेची भूमिका कायम राहिली.
आज डिजिटल पत्रकारितेचे नवे प्रश्न, माध्यमांतील रोजगारकपात, पत्रकारांची आर्थिक असुरक्षितता, वाढते हल्ले, पेन्शन व आरोग्य योजनांतील अडचणी आणि माध्यम स्वातंत्र्यावरील आव्हाने यांचा सामना करण्यासाठी परिषद कटिबद्ध आहे.
शतकपूर्तीकडे वाटचाल करताना परिषदेपुढे केवळ आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचे आव्हान नाही; तर हा वारसा अधिक समृद्ध करून पुढील पिढीच्या पत्रकारांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि स्वतंत्र पत्रकारितेचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारीही आहे.
*पत्रकारांनी जपलेली संस्था, पत्रकारांसाठी जगणारी संस्था*
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा आजवरचा प्रवास हा एका संस्थेचा इतिहास नाही; तो महाराष्ट्रातील पत्रकारांच्या संघर्षाचा, एकजुटीचा आणि आत्मसन्मानाचा इतिहास आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी लढणारी संघटना, माध्यम स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी पुढाकार घेणारी चळवळ, संकटात सापडलेल्या पत्रकारांना मदत करणारी मातृसंस्था, कर्तृत्ववान पत्रकारांचा गौरव करणारे व्यासपीठ आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांना एकत्र बांधणारे संघटनात्मक जाळे—या सर्व भूमिका परिषदेनं एकाच वेळी समर्थपणे पार पाडल्या आहेत.
परिषदेच्या या प्रवासाचे खरे शिल्पकार म्हणजे तिच्यावर विश्वास ठेवणारे पत्रकार, तळागाळात काम करणारे पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते, संस्थेला योगदान देणारे हितचिंतक आणि पूर्वसुरींनी घालून दिलेल्या परंपरेचे जतन करणारे सर्व सहकारी.
पत्रकारांनी परिषदेला केवळ संघटना म्हणून स्वीकारले नाही; तर आपल्या हक्कांची, सन्मानाची आणि सुरक्षिततेची हमी देणारी मातृसंस्था म्हणून तिच्यावर प्रेम केले.
याच प्रेमातून परिषदेचा वेलू गगनावरी गेला आहे. हा विश्वास जपणे, पत्रकारांच्या प्रश्नांवर अधिक ताकदीने लढणे आणि माध्यम स्वातंत्र्याचा आवाज बुलंद ठेवणे, हीच पुढील वाटचालीची दिशा आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या या गौरवशाली प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्व ज्येष्ठ पत्रकारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, सदस्यांना आणि हितचिंतकांना मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
*शरद पाबळे*
विश्वस्त
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद