आजन्म पुरणारा ऊर्जास्रोत बालसंस्कार – ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.
आजन्म पुरणारा ऊर्जास्रोत बालसंस्कार – ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून आज प्रत्येकच गोष्टीचे यांत्रिकीकरण होत आहे. विकसित झालेले ते यंत्र चालविण्याकरिता लागणारी ऊर्जा ही पारंपारिक तथा अपारंपारिक या दोन श्रोतांच्या माध्यमातून प्राप्त केल्या जाते.
किंबहुना तिला साठविण्यासाठी लागणाऱ्या साधन सामुग्रीच्या क्षमतेवर ती किती वेळ वा दिवस पुरणार हे निश्चित होत असते . अर्थातच त्यातील ऊर्जेला काही विशिष्ट काळाची मर्यादा असते. परंतु बालपणातच बाल संस्काराच्या माध्यमातून प्राप्त झालेली एक अध्यात्मिक व अलौकिक ऊर्जा ही आजन्म पुरत असते असे स्वानुभवपूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांशी औपचारिक संवाद साधतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की , आम्ही अगदी बालपणातच संत श्री भास्कर महाराज संस्थान येथे वासुदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने संपन्न होत असणाऱ्या बालसंस्कार शिबिरात विद्यार्थी म्हणून दाखल झालो आणि तिथून प्राप्त केलेली ती ऊर्जा आजतागायत आम्हाला पुरत आहे . किंबहुना ती यावद्जन्म पुरेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. आज रोजी आम्हाला समाजात प्राप्त होणारे पद , प्रतिष्ठा आणि पैसा ही केवळ बाल संस्काराची देण आहे. वास्तविक पाहता अगदी जुजबी शालेय शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला आजच्या काळात उपरोक्त तिन्ही गोष्टीची उपलब्धी केवळ अशक्यप्राय आहे. प्रामाणिकता प्रतीक्षा आणि प्रयत्न या त्रीसुत्री प्रमाणे जीवन जगल्यामुळेच सवंग प्रसिद्धी , प्रलोभन व प्रदर्शन या धोकादायक त्रिवळणावर अडकून न पडता आम्ही आमच्या जीवनाची गाडी वारकरी संप्रदायिक समृद्धी महामार्गावरून हाकत असतांना अपघातग्रस्त झालो नाही हा बालपणीच झालेल्या सुसंस्काराचा परिणाम आहे. याबाबत संत श्री वासुदेवजी महाराज यांच्या सहवासातील अनेक स्वानुभव पूर्ण प्रसंग उद्धृत करून महाराजांनी बालसंस्कार शिबिरार्थींना प्रबोधन केल्याचे व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.