कृष्णा तीरावर वसलेले श्री क्षेत्र औदुंबर भाविकांचे दत्ततिर्थ., सांगली जिल्ह्यातील औदुंबर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध.
कृष्णा तीरावर वसलेले श्री क्षेत्र औदुंबर भाविकांचे दत्ततिर्थ., सांगली जिल्ह्यातील औदुंबर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध.
कृष्णा तीरावर वसलेले श्री क्षेत्र औदुंबर भाविकांचे दत्ततिर्थ., सांगली जिल्ह्यातील औदुंबर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध.

श्री क्षेत्र औदुंबर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले अत्यंत पवित्र आणि जागृत दत्तस्थान आहे. हे ठिकाण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.

श्री नृसिंह सरस्वती (जे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात) यांनी येथे चातुर्मास केला होता. या वास्तव्यामुळे या भूमीला विशेष पावित्र्य प्राप्त झाले आहे.औदुंबर वृक्ष: येथे औदुंबर वृक्षाखाली दत्तपादुका आहेत. अशी मान्यता आहे की या वृक्षाखाली केलेले ‘गुरुचरित्र’ पारायण आणि पूजा आत्मिक समाधान देणारी फलदायी ठरते.

कृष्णा नदीच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातच ब्रम्हानंद स्वामींचा मठ, ध्यान कक्ष आणि अन्नछत्र (महाप्रसाद) व्यवस्था आहे.

या ठिकाणी जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन: भिलवडी (८ किमी) आणि किर्लोस्करवाडी (१५ किमी).असून जवळचे विमानतळ कोल्हापूर (५८ किमी) आहे.रस्ता मार्ग सांगली आणि आष्टावरून रस्त्याने थेट औदुंबर येथे पोहोचता येते.

नरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा लाड म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे.

श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांनी सन १४४१मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.
या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्रीदत्तपादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे.
तुझ्या जळानें मनें आमुची तूं धवळित राही, कृतज्ञभावें तुला वंदिता श्रीकृष्णामाई !
अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करुन आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जावयाचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यत जाता येते. हा घाट येथील ब्रम्हानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे.

दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागला की, बाजूच्या ओवऱ्यांतून दत्तभक्त गुरूचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार मह्त्व आहे. अत्यंत काटेकारपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्तसाक्षात्कार सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेवराऊळ, जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ इत्यादि थोर दत्तभक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो.
या ठिकाणी स्वत: नरसिंहसरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते, त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते.

मंदिराच्या परिसरांत औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया – प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या औदुंबरांच्या छायेतून मंदिरप्रदक्षिणा करुन, वरच्या ’आजोबा’ वडाखालच्या वाटेने गेले की, ब्रम्हानंदस्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरूशास्त्री नावाचे एक विद्वान गृह्स्थ होते. त्यांनी ब्रम्हानंदांच्या सहाय्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ’ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली.
ब्रम्हानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी भक्त-भाविकांकडून वर्गणी गोळा करुन औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रम्हानंद मठातच श्रीवासुदेवानंदसरस्वती (दत्तसंप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरूष) यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती. पु़ढे या मठात श्रीनारायणानंदतीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहात असत.
औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात.
श्रीक्षेत्र औदुंबर दत्ततिर्थ खूपच मनोहारी, प्रसन्नता देणारे वाटले, आध्यात्मिक आनंद देणारे क्षेत्राला भेट देऊन आत्मिक समाधान, भक्ती आणि आनंद मिळाला…
सौ. निता सत्यशील सावरकर, तेल्हारा जिल्हा अकोला
सौ. माधुरी आकाशराव साबे,आंबेवाडी सिंहगड रोड, पुणे