दिशा समितीची बैठक,खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत,विविध योजना व विकासकामांचा आढावा.
दिशा समितीची बैठक,खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत,विविध योजना व विकासकामांचा आढावा.
दिशा समितीची बैठक,खासदार अनुप धोत्रे यांच्या अध्यक्षतेत,विविध योजना व विकासकामांचा आढावा.

अकोला, दि. २९ : केंद्र शासनाच्या विविध योजनांतून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. अशी कामे रखडता कामा नयेत. ती वेळेत पूर्ण व्हावीत. आवश्यक कामांचे वेळेत प्रस्ताव द्यावेत, तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना करून द्यावा, असे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) समितीची बैठक खासदार श्री. धोत्रे यांच्या अध्यक्षतेत नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार नितीन देशमुख, महापौर शारदा खेडकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांच्यास सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत २०२१-२२ दरम्यान मंजूर असलेले १०५.३१ किमी लांबीचे ९ रस्ते बांधकामाचे काम पूर्ण झाले. २०२२-२३ मधील १०.७० किमी लांबीचे काम पूर्ण झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण नसल्याच्या तक्रारी येतात. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश खासदार श्री. धोत्रे यांनी दिले.

हिवरखेड येथील नदीत मर्यादेबाहेर उत्खनन झाल्याची तक्रार आहे. ही बाब गंभीर असून, त्याची तपासणी करावी व अनधिकृत खनन झाले असल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, असेही निर्देश देण्यात आले.
मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावरील वाहन पार्किंग, लिफ्ट आदी सुविधा त्वरित सुरू कराव्यात. ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांच्या इमारतींची पाहणी व्हावी. आवश्यक सुधारणा कराव्यात. टपाल खात्याच्या महत्वपूर्ण सुविधा खातेदारांसाठी उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्गाची कामे होत असताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. ‘बीएसएनएल’कडून ग्रामीण भागात आवश्यक ठिकाणी मोबाईल टॉवर उभारून संपर्कयंत्रणा सुरळीत करावी, असे निर्देश खा. धोत्रे यांनी दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत. कामे अपूर्ण किंवा प्रलंबित राहिली की नव्याने सुरू करताना दुरूस्तीसाठी पुन्हा खर्च होतो. स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यात सार्वजनिक स्वच्छता गृहांची गरज तपासा. त्यानुसार प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्वच्छ भारत मिशन शहरी महानगरपालिका २१ कोटी १७ लक्ष रु निधीतून बायोमायनिंग प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. उगवा परिसरात रात्रीच्या वेळी दुर्गंधी पसरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्याबाबत आवश्यक उपाययोजना व्हाव्यात. रेल्वे लाईनअंतर्गत कामांत पारस येथील अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. तिथे ड्रेनेजची व्यवस्था व्हावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, जननी सुरक्षा योजना व जननी शिशु सुरक्षा योजना, सर्वशिक्षा अभियान, उज्ज्वला योजना, राष्ट्रीय कृषी बाजार, अमृत, उमेद, मध्यान्ह भोजन योजना. प्रधानमंत्री शहरी व ग्रामीण आवास योजना,महास्वामित्व योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यांचा आढावा घेण्यात आला.