संतश्री वासुदेवांची कृतार्थ जननी : मातोश्री चंद्रभागादेवी.
संतश्री वासुदेवांची कृतार्थ जननी : मातोश्री चंद्रभागादेवी.
संतश्री वासुदेवांची कृतार्थ जननी : मातोश्री चंद्रभागादेवी.

बीज हे कितीही उच्च प्रतीचे असले तरी , त्याला अंकुरित , विकसित व पूर्णपणे विशाल वृक्षात रूपांतरित होण्याकरिता माती ( जमीन ) महत्त्वाची असते. कारण बिजावर उपरोक्त कुठलीही प्रक्रिया आकाशात होत नाही. तद्वत मानवी जीवनात सुद्धा प्रथम बालक रूपाने जन्म , सामान्य व्यक्ती म्हणून परिचय आणि व्यक्तिमत्वच्या विकासाकरिता मातेची ( जननीची ) भूमिका सर्वात महत्त्वाची असते.संतश्री वासुदेवजी महाराज यांचा केवळ एखादे अलौकिक बालक म्हणून जन्मच नाही तर, त्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचा संतत्वा पर्यंत विकसित झालेल्या खडतर जीवन प्रवासामध्ये ज्या कृतार्थ जननीचे सर्वात मोठे योगदान आहे, त्या मातोश्री चंद्रभागादेवी पुंडलिकरावजी पाटील जायले यांच्या छप्पन्नाव्या पुण्यतिथी निमित्ताने थोडेसे चिंतन.

सत्पुत्र हा मातेचे विचार अर्थात मानसिकता आणि पित्याचा आचार म्हणजेच नैतिकता ( चरित्र ) याचे प्रत्यक्ष चलचित्र असतो . म्हणूनच सुपुत्राच्या जन्माकरिता मातापित्याच्या आचार विचार शुद्धतेची नितांत आवश्यकता आहे . ते जर शुद्ध नसतील तर , ते पुत्ररुपी चित्र हे चित्र न राहता विचित्र होऊन ; तो समाजाला त्यांच्या आचार विचाराचे दर्शन घडविणारा प्रत्यक्ष आरसाच होत असतो.अर्थातच आजची बिघडलेली तरुणाई हे माय बापाच्या आचारहिनतेचा परिणाम आहे. याउलट सन१९९९ मध्ये इंग्लंड मधील इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर केंब्रिज या संस्थेने २१ व्या शतकातील थोरदृष्टा म्हणून केलेल्या कार्याच्या गौरवामुळे जागतिक आश्चर्याचे तसेच गद्यपद्यात तब्बल ३७ संशोधनात्मक ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये अध्वर्यू म्हणून असलेले आदराचे स्थान असणाऱ्या संतश्री वासुदेवजी महाराजांचे पंजोबा हे नागपूरचे रघुजीराजे भोसले यांचे मातब्बर सरदार होते. त्यांच्याच माध्यमातून अकोली ही गाव त्यांना जहागिरी म्हणून प्राप्त झालेले होते. त्यांचे उदरी श्रींच्या श्रीफळ प्रसादाने भास्कर पाटील यांचा जन्म झाला. त्यांच्या शेत सर्वे नंबर ५२ मधील कोरड्या ठणठणीत विहिरीला श्रींनी पाणी लावल्यानंतर त्यांनी जहागिरी आदिचा त्याग करून सर्वस्वी श्रीगुरु सेवेचा मार्ग स्वीकारला. एके दिवशी शेगाव वरून अकोली येथे येत असतांना मध्येच सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बेलुरा नामक ग्रामामध्ये हे गुरु शिष्य थांबले असतांना तेथील गर्भश्रीमंत श्रीयुत संपतरावजी पाटील मंगळे आपल्या तान्हाबाई नामक मुलीसह दर्शनाकरिता आले. तेव्हा श्रींनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून भास्कर पाटलांना सांगितले की, ही तुझी सून होईल. पुढे अकोली येथील नथ्थू पाटील यांचे चिरंजीव पुंडलिकराव यांना दत्तक घेऊन, त्यांचा विवाह श्रींच्या इच्छेनेच पार पडला. पुढे सासू गंगाबाई यांनी त्यांचे प्रेमाने चंद्रभागा हे नाव ठेवले. त्याच श्रद्धा व विश्वास रुपी दंपत्यांच्या उदरी दोन मुले व दोन मुली अशा चार अपत्यांचा जन्म झाला त्यापैकीच एक म्हणजे २४.२.१९१७ फा.शु. तृ.शके १८३९ शनिवार रोजी सकाळी सात वाजता या अवनीतलावर अवतरी झालेले संतश्री वासुदेवजी महाराज हे होत. आ.शु.१० शके १८५२ रोजी अकाली पितृछत्र हरवल्यामुळे यांच्या संगोपनाची सर्वस्वी जबाबदारी मातोश्रींनी समर्थपणे सांभाळली. त्यांनीच शिबिरांच्या माध्यमातून ‘संस्कार’ , संतश्री भास्कर महाराज समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करवून घेत ‘संस्थान’ व वासुदेवजी महाराजांच्या रूपाने ‘संत’ असे तिन ‘स’कार आम्हास प्रधान केले. आजन्म सेवारत असणाऱ्या सेवाव्रती आ.कृ. अष्टमीला १९७० रोजी सर्व साधकांना व साधकांचे मायबाप असणाऱ्या संत वासुदेवजी महाराजांनाही पोरके करून, इहलोकीची यात्रा संपन्न परलोकी निघून गेली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे शब्दसुमन त्यांचे चरणी समर्पित.

श्री ज्ञानेश्वरदासानुदास.,श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ. (श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ )