आपला जिल्हा अकोला

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन., उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – जिल्हाधिकारी वर्षा मीना 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन., उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार - जिल्हाधिकारी वर्षा मीना 

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन., उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – जिल्हाधिकारी वर्षा मीना 

अकोला, दि. ३० : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे. पात्र शेतक-यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रांनाही निर्देश देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे सांगितले. 

योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी पत्र-परिषद आज झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा उपनिबंधक गीतेशचंद्र साबळे, अभय कटके, ज्योती मलिये आदी उपस्थित होते.

प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.  

पोर्टलवर ९० हजार ८७९ कर्जखाती अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी ४९ हजार २५० पात्र लाभार्थी शेतकऱ्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत २८ हजारहून अधिक शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. अद्यापही ज्या शेतक-यांची ई-केवायसी बाकी आहे. ती त्यांनी तात्काळ करून घ्यावी. जिल्ह्यात ८०३ आपले सरकार सेवा केंद्रांवर आधार प्रमाणीकरण सुरू आहे. सर्व आपले सरकार केंद्रांना सकाळच्या वेळेतही केंद्रे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ई-केवायसीसाठी केंद्रांनी कुठलेही शुल्क आकारू नये अशा सूचनाही सहकार आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे, बँकांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

आधार प्रमाणीकरणानंतर शेतक-यास द्यावयाच्या कर्जमाफीची रक्कम निश्चित होऊन सदर रक्कम थेट लाभ वितरण पध्दतीने शेतक-यांच्या कर्जखात्यात जमा करुन कर्ज खाते निरंक करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना नव्याने पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026

• राज्य शासनाने दि. 02 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ही योजना जाहीर केली आहे. 

• या योजनेमध्ये खालीलप्रमाणे तीन घटक आहेत

अ) कर्जमाफी : 

कर्जवाटप दिनांक : 01/04/2019 ते 31/03/2025 

थकबाकी दिनांक : 30/09/2025 

कर्जबाकी दिनांक : 31/03/2026

कर्जमाफी रक्कम : रुपये दोन लाख 

ब) एकवेळ समझोता योजना (OTS): 

कर्जवाटप दिनांक : 01/04/2019 ते 31/03/2025 

थकबाकी दिनांक : 30/09/2025 

कर्जबाकी दिनांक : 31/03/2026

कर्जमाफी रक्कम : रुपये दोन लाखावरील रक्कम शेतक-याने बँकेत जमा केल्यानंतर कर्जमाफी रुपये दोन लाख

क) प्रोत्साहनपर लाभ : सन 2022-23, 2023-24 व दिनांक 2024-25 या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षी पीक कर्जाची उचल करुन विहित मुदतीत परतफेड आवश्यक तसेच सन 2025-26 मधील पीक कर्जाची विहित मुदतीत परतफेड करणा-या शेतक-यांना रुपये पन्नास हजार पर्यत अनुदान

* या योजनेमध्ये रुपये दोन लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांनी रुपये दोन लाखावरील रक्कम दि. 31 मार्च 2027 पर्यत बँकेत जमा करावयाची आहे.  

• या योजनेमध्ये दि. 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचा समावेश आहे. 

• त्याचप्रमाणे सदर पीक कर्ज तसेच पुनर्गठित / फेरपुनर्गठित कर्जाची दि. 30 सप्टेंबर 2025 अखेरची थकबाकी जी दि. 31 मार्च 2026 पर्यत परतफेड झालेली नाही अशी रक्कम कर्ज माफीसाठी विचारात घेण्यात आली आहे. 

• या योजनेची अंमलबजावणी महा-आयटी मार्फत विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. या प्रणालीवर बँकांनी एकूण 31.17 लाख कर्ज खात्याची माहिती सादर केली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील 10.01 लाख व व्यापारी बँकाकडील 21.16 लाख कर्जखात्यांचा समावेश आहे. 

• शासनाने दि. 09 जून 2026 रोजी सर्व व्यापारी बँकांना पत्र देऊन अनुत्पादित वर्गवारीतील खात्यांना विशिष्ठ प्रमाणात सवलत (Haircut) देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे शासनाने दि. 01 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना पत्र देऊन दि. 01 एप्रिल 2026 नंतर योजनेतंर्गत शेतक-यांच्या कर्जखात्यावर व्याजाची आकारणी न करण्याबाबत निर्देश दिले आहेत. शासनाने अनुत्पादित कर्जखात्यांबाबत बँकांनी खालीलप्रमाणे सवलत देण्याबाबत सूचित केले आहे.

अ.क्र अनुत्पादित कर्जाचा दिनांक तडजोडीची रक्कम

1 दि. 30/09/2021 किंवा त्यापूर्वी अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 35 टक्के

2 दि. 01/10/2021 ते 30/09/2022 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 45 टक्के

3 दि. 01/10/2022 ते 30/09/2023 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 55 टक्के

4 दि. 01/10/2023 ते 30/09/2024 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 70 टक्के

5 दि. 01/10/2024 ते 30/09/2025 अनुत्पादित तारखेस कर्ज खतावणीमधील कर्जबाकीच्या 85 टक्के

• प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये रुपये दोन लाखापर्यत थकबाकी असलेल्या कर्जखात्यांचा समावेश आहे. उर्वरित कर्जखात्यांचा समावेश त्याचप्रमाणे रुपये दोन लाखावरील कर्जखात्यांचा समावेश यानंतर प्रसिध्द होणा-या यादयांमध्ये करण्यात येणार आहे. 

• आधार प्रमाणीकरणावेळेस शेतक-यास आधार क्रमांक, कर्ज खात्याचा क्रमांक तसेच कर्ज रक्कमेच्या अचूकतेबाबत तथा मान्यतेबाबत कार्यवाही करावयाची आहे.

• आधारप्रमाणीकरणासाठी प्रसिध्द केलेली यादी योजनेच्या प्रणालीवर, बँक शाखेमध्ये तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे उपलब्ध असून सदरची यादी गावस्तरावर, बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायत / चावडीवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीमध्ये शेतक-यांच्या नावांसमोर दिसणारी कर्जखात्यांची रक्कम तसेच आधार प्रमाणीकरणावेळी शेतक-यांस दिसणारी रक्कम वेगवेगळी असल्याने त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत आहे. 

• शेतक-यांनी बँकेच्या यादीतील रक्कम त्याचप्रमाणे प्रणालीवरील रक्कम पाहून आधारप्रमाणीकरण करावयाचे आहे. गावस्तरावर प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये दिसत असलेली रक्कम वर नमुद केल्याप्रमाणे अनुत्पादित कर्ज खात्यास निर्देशित प्रमाणात सवलत (Hair cut) आकारुन आलेली तडजोड रक्कम आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बँकांकडून दि. 01/04/2026 नंतर योजनेतंर्गत शेतक-यांच्या कर्ज खात्यावर व्याजाची आकारणी होणार नाही. त्यामुळे याबाबत स्पष्ट करण्यात येते की, दिनांक 25 जुलै 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील रुपये दोन लाखापर्यतची रक्कम शासनामार्फत माफ करण्यात येणार आहे व शेतक-यांना कोणतीही रक्कम बँकेत भरावी लागणार नाही. 

• ज्या शेतकऱ्यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२२-४९१५०८०२ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!