ज्ञानेशांची इच्छापूर्ती करणारे संत : श्री ज्ञानेश्वरदास.
ज्ञानेशांची इच्छापूर्ती करणारे संत : श्री ज्ञानेश्वरदास.
ज्ञानेशांची इच्छापूर्ती करणारे संत : श्री ज्ञानेश्वरदास.

भगदावतारी संत आपले कार्य ठरवून या अवनीतलावर जगदोद्धारार्थ स्वेच्छेने अवतरीत होत असतात. आणि नियोजित आयुष्य मर्यादेच्या आतच आपले सर्व अवतार कार्य पूर्ण करीत , त्याचा लेखाजोखा भगवद्दरबारी सादर करून, अवतार समाप्तीची परवानगी त्यांच्याकडे मागत असतात. या नियमाप्रमाणे वयाच्या अवघ्या एकविस वर्षाच्या आत अभंग गाथा, हरिपाठ , चांगदेव पासष्टी, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभवादि जगद्मान्य अद्वितीय स्वरूप ग्रंथसंपदा निर्मितीसह आबालवृद्धांच्या उद्धारार्थ स्वतःच्या खांद्यावर पताका घेऊन श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायी वारी सोहळ्याची सुरुवात करून, त्याची घडी व्यवस्थित बसवून, भगवानश्री ज्ञानोबाराय वारी निमित्य भावंडांसह पंढरीक्षेत्री आले असतांना भगवान पंढरीशांचे दर्शन घेऊन, शके १२१८मध्ये त्यांना विनंती करतात की, हे देवा ! “ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी l समाधान तूंचि होसी l ‘परी समाधि हे तुजपासी l घेईन देवा’ ll ” तेव्हा भगवंत त्यांच्या मागणीतील ‘पंढरी क्षेत्र’ वगळून समाधीसाठी आळंदी क्षेत्र निश्चित करतात. आणि कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२१८ दि.२५.११.१२९६ गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता वयाच्या अवघ्या २१ वर्ष ३ महिने पाचव्या दिवशी स्वहस्ते संजीवन समाधी देतात. आपले आराध्य असणाऱ्या भगवानश्री ज्ञानेशांच्या पंढरी क्षेत्रात समाधी घेण्याच्या त्या इच्छेची पूर्तता संतश्री ज्ञानेश्वरदासांनी तब्बल ७१३ वर्षानंतर शके १९३१ ला पूर्ण करून घेतली त्यासंबंधी थोडेशे चिंतन.

तिये स्थितप्रज्ञेचेनि लाभें l मनचि सारस्वतें दुभे l मग सकळ शास्त्रें स्वयंभे l निघती मुखें ll या ज्ञानेशवचनांनुसार योगभ्रष्ट महात्म्याला जातिस्मरतेमुळे गतजन्मात तयार झालेली बुद्धी अनुकूल असल्यामुळे , त्याचे मनच सर्व विद्यांना प्रसवते आणि मग सर्व शास्त्र आपोआपच त्याच्या मुखातून निघतात . या न्यायाने जातिस्मर असणाऱ्या संतश्री वासुदेवजी महाराज उपाख्य ज्ञानेश्वरदासांना सुद्धा बालपणीच सर्वज्ञतेने वरलेले असल्यामुळे, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून कीर्तनाच्या निमित्ताने त्यांच्या ‘मुखातून’ तसेच गद्यपद्यात्मक तब्बल ३७ ग्रंथ संपदेच्या माध्यमातून, त्यांच्या सिद्धहस्त ‘लेखणीतून’ प्रत्यक्ष ज्ञानगंगाच प्रवाहित झाली. नैष्टिक बालब्रह्मचारी व आजन्म अखंड सेवाव्रत्ती असणाऱ्या या अजानबाहू महात्म्याने वारकरी संप्रदायावर होत असणारे अतिक्रमण आणि आक्रमण सर्व शक्तीनिशी सनदशीर मार्गाने परतविले. असे असतांना सुद्धा कुठल्याही गोष्टीचा गवगवा किंवा त्या यशाच्या श्रेयाचा मोठेपणा मिरवत कुठलाही पुरस्कार किंवा सत्कार आयुष्यात न स्वीकारता ज्ञानेशादि चारही भावंडांची जन्म ,लीला, कर्म व अखंड वास्तव्याने पुनित झालेली आळंदीस्थित सिद्धबेट नामक भूमीला समाजकंटकांच्या घशातून काढून, वारकऱ्यांकरीता मुक्त केल्यानंतर आपल्या अवतार कार्याचा लेखाजोखा दि.३०.६.२००९ रोजी योगी सम्राट श्रीसंत गजानन महाराज संस्थान शाखा पंढरपूर येथे दुपारी प्रवचन व रात्रौ कीर्तनाच्या माध्यमातून भगवान पंढरीशांना सुपूर्त करून,”हेचि व्हावी माझी आस l जन्मोजन्मीं तुझा दास ll पंढरीचा वारकरी l वारी चुकों नेदी हरी ll” या जगद्गुरुंच्या वचनांद्वारे विनंती अर्ज त्यांना सदर केला. भगवंतांनी सुद्धा त्यात कुठलीही त्रुटी न काढता तो आहे तसा मंजूरही केला. अखेरीस २.७.२००९ आषाढ शुद्ध एकादशी शके १९३१ गुरुवार रोजी रात्रौ ९.४५ ला ज्ञानोबा तुकोबारायादि सर्व साधुसंतांच्या पंढरीक्षेत्री आगमनानंतर किंबहुना त्यासर्वांच्या पावन सूक्ष्म उपस्थितीत भगवान श्री ज्ञानेशांची “परि समाधि हे तुजपासी l घेईन देवा ll” हे अपूर्ण राहिलेली इच्छा श्रीसंत ज्ञानेश्वरदासांनी पूर्ण करून घेतली. अशा ज्ञानेशांची इच्छा व कार्यपूर्ती करणाऱ्या ज्ञानेश प्रिय संतश्री ज्ञानेश्वरदासांच्या आषाढी एकादशी पर्व काळावर पंढरीक्षेत्री संपन्न होत असणाऱ्या पुण्यतिथी निमित्ताने हे शब्द सुमन त्यांची चरणी समर्पित.

श्री ज्ञानेश्वरदासानूदास श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ. (श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी,भैरवगढ ).