माउंट कार्मेल स्कूल अकोला येथे सहाशे विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षेची मॉक टेस्ट.
आ. साजिद खान पठाण यांचा उपक्रम; माजी मंत्री नितीन राऊत यांची भेट, विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा.
माउंट कार्मेल स्कूल अकोला येथे सहाशे विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षेची मॉक टेस्ट.
आ. साजिद खान पठाण यांचा उपक्रम; माजी मंत्री नितीन राऊत यांची भेट, विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा.

अकोला : वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या ‘नीट’ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली मॉक टेस्ट रविवारी (१२ एप्रिल) शहरातील माउंट कार्मेल स्कूल येथे यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला.

पश्चिम अकोला मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या पुढाकारातून ही मॉक टेस्ट आयोजित करण्यात आली होती. परीक्षेपूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले होते की, स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यास नव्हे, तर परीक्षेच्या स्वरूपाची सवय आणि वेळेचे व्यवस्थापनही अत्यंत महत्त्वाचे असते. त्याच धर्तीवर ‘नीट’ परीक्षेसारखे वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना सरावाची संधी देण्यात आली.
मॉक टेस्टदरम्यान प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेची मर्यादा आणि परीक्षा पद्धती या सर्व बाबी ‘नीट’च्या धर्तीवर ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तयारीचे वास्तव मूल्यमापन करता आले. कोणत्या विषयात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे, याची स्पष्ट जाणीव या परीक्षेमुळे झाल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी स्थानिक पोलिस प्रशासन तसेच माउंट कार्मेल शाळा व्यवस्थापनाचे, एनएसयूआय पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि साजिद खान मित्र मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले. आयोजक आ. पठाण यांनी या सहकार्याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना आगामी ‘नीट’ परीक्षेसाठी शुभेच्छा देत अशाच शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या मॉक टेस्टला काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार नितीन राऊत यांनीही भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शनाची गरज अधोरेखित केली.
शैक्षणिक तज्ज्ञांच्या मते, अशा सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, प्रश्न सोडवण्याची गती आणि अचूकता सुधारते, तसेच परीक्षेतील तणाव कमी करण्यास मदत होते. त्यामुळे अंतिम परीक्षेपूर्वीची ही मॉक टेस्ट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे चित्र दिसून आले.