ज्ञानाचा पान्हा पाजणारी आई ज्ञानाबाई – श्री ज्ञानेश्वरदासानुदास,भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.
ज्ञानाचा पान्हा पाजणारी आई ज्ञानाबाई - श्री ज्ञानेश्वरदासानुदास,भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.
ज्ञानाचा पान्हा पाजणारी आई ज्ञानाबाई – श्री ज्ञानेश्वरदासानुदास,भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

सजीव सृष्टीतील चौऱ्यांशी लक्ष योनी पैकी सस्तन असणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे जन्माला येताच प्रथम काही दिवसाचे पोषण केवळ मातृ स्तनातील दुधानीच होत असते. परंतु ते दूध एका विशिष्ट कालखंडापर्यंतच प्राप्त होत असते. तेही सर्वांनाच मुबलक प्रमाणात मिळेलच असेही नाही. काहींना तर दुर्भाग्यवश बालपणात किंवा जन्मताच मातृवियोगाच्या दुःखाचे सावट पडल्याने त्या न्याय हक्कापासून वंचित राहावे लागते. म्हणून त्यांच्याकरिता स्वराज्याचे द्वितीय छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे धाराऊ माता किंवा गोमातेच्या दुधाचा पर्याय वापरला जातो. तर काही त्यालाही अपवाद असून , बाळ उपमन्यू प्रमाणे त्यांना पाण्यात पीठ कालवून सुद्धा पाजल्या गेल्याचा इतिहास आहे.
शके बाराशतें बारोत्तरें l तैं टीका केली ज्ञानेश्वरें l सच्चिदानंदबाबा आदरें l लेखकु जाहला ll
शके १२१२ पासून १९४७ म्हणजे आजतागायत तब्बल ७३५ वर्षे केवळ शारीरिक पोषणा करिता पोटभऱ्या दुधाने नव्हे तर , आत्म्याच्या पुष्टी, तुष्टी आणि संतुष्टी करिता आत्मोध्दारक अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ईश्वरीय ज्ञानामृताचा सुपाच्य प्रेम पान्हा आकंठ पाजणारी आई ज्ञानाबाई अर्थातच ज्ञानोबाराय होत. अशी आई वारकरी संप्रदायिक साधकांना प्राप्त झाल्यामुळे आजही ते सर्व निर्भर आहेत . किंबहुना त्यामुळेच ज्ञानोबाराय पुरुष देहधारी असतांना सुद्धा संपूर्ण जग ज्यांना विश्व माऊली म्हणून संबोधते . त्या भगवान श्री ज्ञानोबारायांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण ( ७५० ) महोत्सवी अवतिर्णोत्सवा निमित्ताने थोडेसे चिंतन.
तीर्थयात्रा किंवा पर्यटना करीता गेलेले पर्यटक तेथील उंचच्या उंच देवालयांच्या शिखरांकडे तथा त्यांच्या भिंतीच्या दगडावरील बारीक कलाकुसरी कडे पाहत त्यांच्या सोबत आपले छायाचित्रे काढता . परंतु ते मंदिर पायातील ज्या भरभक्कम दगडांवर उभारलेले असते त्यांच्याकडे मात्र कुणाचेच लक्ष जात नाही. किंवा ते दगड कधीच छायाचित्रात येत नाहीत. आपण सुद्धा त्यात आलो पाहिजे अशी भावना ज्या दिवशी त्यांच्या मनात निर्माण होईल , तेव्हा ते मंदिरे किती वेळ पर्यंत उभे राहतील ? याचा आपण केवळ विचारच केलेला बरा. अर्थातच हा विचार त्यांच्या मनात कधीच येत नाही , त्यामुळेच आपली सर्व मंदिरे सुरक्षित आहेत. किंबहुना म्हणूनच प्रत्येक सुज्ञ दर्शनार्थी त्या मंदिरात प्रवेश करीत असतांना त्यातील इष्ट देवतेच्या प्रतिमे अगोदर त्या पायातील दगडांचा प्रतिनिधी म्हणून प्रथम त्या पायरीचे दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त करीत असतो. तद्वत तत्कालीन राजकीय व साहित्यिकी सत्ता गाफील राहण्यामुळे पैठणातील समांतर सत्तेने ठोठावलेल्या देहांतप्राय:श्चित्त या शिक्षेच्या अंमलबजावणीच्या रूपाने वारकरी संप्रदायिक भागवत धर्मरूपी इमारतीच्या मजबुती करिता तिच्या पाया मध्ये आत्मबलिदान दिल्यामुळे छायाचित्र किंवा चरित्रात्मक भागात सुद्धा जास्त प्रमाणात न दिसणाऱ्या परंतु वारकरी संप्रदायामध्ये सर्वप्रथम वंदनीय असणाऱ्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देवी यांच्या उदरी श्रावण वद्य अष्टमी शके ११९७ रोहिणी नक्षत्र , युवानाम संवत्सरात गुरुवारी रात्रौ १२ वाजता दि. १५ . ८ . १२७५ रोजी प्रत्यक्ष महाविष्णू भगवान श्री ज्ञानोबारायांच्या रूपाने या अवनीतलावर अवतीर्ण झाले.
अर्जुना संकट पडतां जडभारी l
गीता सांगें हरि कुरुक्षेत्रीं ll
तोची अवतार धरी अलंकापूरी l
ज्ञानाबाई सुंदरी तारावया ll
त्या गोष्टीला १५. ८ .२०२५ रोजी त्याला ७५० वर्ष पूर्ण होत असून ; यावर्षी त्यावेळची तिथीचा व तारीखेचा सुद्धा सुयोग घडून येतो आहे.
संन्याशाची मुले म्हणून आळंदीकरांकडून उपेक्षित असतांना सुद्धा ज्यांच्याकडे कुठल्याही शाळा महाविद्यालयात न जाता उपजतच अनेक विद्वानांना लाजविणारी विद्वत्ता , अनेक कवींना लाजविणारे क्रांतदर्शी व परतत्वस्पर्शी कवित्व आणि स्वतः लहानपणीच मातृप्रेमापासून वंचित असतांना अनेक आईंना लाजविण्या एवढे निर्निमित्यप्रेम असल्यामुळे त्यांना सर्वांनी सार्थ अशी माऊली ही मानद उपाधी बहाल केली. ज्यांनी वेदशास्त्रादिक ग्रंथांमध्येमध्ये पारंगत विद्वानांकरिता सिद्धांवाद असणाऱ्या अमृतानुभव नामक आत्मसंवादाची , योगयागादिकात निष्णात असलेल्यांसाठी मित्र संवाद असणाऱ्या चांगदेव पासष्टीची , आत्मोद्धारास तळमळनाऱ्या साधकांकरिता श्रोत्रृसंवादातून तत्त्वज्ञानाची उकल करणाऱ्या
ग्रंथराज ज्ञानेश्वरीची तर , सर्वसामान्य अनाथांकरिता जनसंवाद अशा लोकसुलभ हरिपाठ नामक ग्रंथांची निर्मिती केली व त्यांच्या अधिकारानुरुप चहुपुत्रांना त्याची वाटणी करून आपले मातृत्व अर्थात माऊलीपण सिद्ध केले. तसेच ज्यांच्या स्वभावामध्ये सर्वभूतांविषयी समत्व , साधकांसंबंधी ममत्व , आबालवृद्धांचा कळवळा व ते प्रत्यक्ष चैतन्याचा जिव्हाळा असल्यामुळेच त्यांना ज्ञानियांचा राजा म्हणून सुद्धा संबोधल्या जाते. त्या प्रत्यक्ष ज्ञानाचा ईश्वर असणाऱ्या ज्ञानराजांच्या चरणी हे वाक्पुष्प समर्पित.
तरी न्यून तें पुरतें l अधिक तें सरतें l करूनि घेयावे हें तुमतें l विनवितु असें ll
श्री ज्ञानेश्वरदासानुदास
भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.