खरिपात शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नयेत, बोगस बियाणे, खत लिकेंजसारखे प्रकार घडू नयेत याची दक्षता घ्यावी – आमदार प्रकाश भारसाकडे.
तेल्हारा तालुक्यातील खरीपपूर्व आढावा बैठकीत निर्देश.
- खरिपात शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नयेत, बोगस बियाणे, खत लिकेंजसारखे प्रकार घडू नयेत याची दक्षता घ्यावी – आमदार प्रकाश भारसाकडे.
तेल्हारा तालुक्यातील खरीपपूर्व आढावा बैठकीत निर्देश.

तेल्हारा, दि. १० :
खरिप हंगामात या वर्षी शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नयेत, बोगस बियाण्यांची कुठेही विक्री होता कामा नये, त्याचप्रमाणे रासायनिक खतासोबत इतर उत्पादनांचे लिंकेजही कुठे होऊ नये. या संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, असे निर्देश आमदार प्रकाश भारसाकडे यांनी आज येथे दिले.

तेल्हारा तालुका स्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या अध्यक्षतेत तहसील कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमोल मिटकरी,जिल्हा कृषी अधिकारी शंकर किरवे प्रकल्प संचालक आत्मा मुरलीधर इंगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी तुषार जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी तुषार ढंगारे, तहसीलदार समाधान सोनवणे,तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे,तालुका कृषी विकास अधिकारी भारत चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बद्रुजमा, आत्मा समितीचे पुंजाजी मानकर उपस्थित होते.आढावा सभेस कृषी, महसूल, विजवितरण चे राठोड, विभागाचे विविध अधिकारी,पोलीस अधिकारी व स्थानिक प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोगस बियाण्यांची विक्री, खतांचे लिंकेज, शेतकऱ्यांचे नुकसान, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.
आमदार प्रकाश भारसाकडे म्हणाले की, कृषी निविष्ठांचा साठा व पुरवठ्याबाबत सजग राहून संनियंत्रण करावे. शेतकरी बांधवांची कुठेही फसवणूक होता कामा नये. घरगुती बियाण्याचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली.
तालुकास्तरावर ई-केवायसी शिबिरे आयोजित करावीत जेणेकरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल. ‘अॅग्रीस्टॅक’ पोर्टलवरील नोंदणीबाबत सर्वदूर जनजागृती करावी. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत ३५ टक्के अनुदान देण्यात येते. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
आमदार अमोल मिटकरी यांनी शेतकऱ्यांसाठी आपण आहोत त्यांच्या तक्रारी चे निवारण करा, बियाणे, खते यांची साठेबाजी टाळावी यासाठी भरारी पथकाचे नियोजन त्यात अधिकारी सोबत एक शेतकरी प्रतिनिधी ठेवण्याचे सुचवले,पीक नुकसानीचे सर्वेक्षण तत्काळ व्हावे.पीक विमा योजनेत खरबुजाचे उत्पादन समाविष्ट करावे, बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते त्यामुळे संपूर्ण बियाण्यांच्या मागणीच्या १० टक्के साठा जास्तीचा राखीव ठेवण्यात यावा. रेशीम शेती वाढवण्यासाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात. असे निर्देश आमदार अमोल मिटकरी यांनी दिले. यावेळी दानापूर चे शेतकरी सुभाष रौदंळे, खंडाळा चे गजानन वानखडे,बेलखेड चे श्रीराम वाकोडे, शाम वानखडे,आडगाव मानकर व शेतकरी संघटनेचे युवक यांनी विविध समस्या मांडल्या.
कार्यक्रमाचे अहवाल व गोषवारा वाचन कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी केले. सुत्रसंचालन कृषी सहाय्यक मनोज सारभुकन यांनी केले तर आभार रविंद्र माळी यांनी व्यक्त केले.
तेल्हारा तालुक्यातील विविध पिके व फळांचे विक्रमी उत्पादन घेणारे उद्यान पंडीत,उत्कृष्ट शेतीनिष्ठ दहा शेतकरी सचिन गजाननराव कोरडे हिंगणी,गजानन किसनराव वानखडे खंडाळा, अनिल भिकाजी इंगळे चितलवाडी, अशोक तुळशीराम नाठे दानापूर, जयेश चंद्रशेखर बोहरा हिवरखेड, गोपाल किसनराव येऊन दानापूर, यश संतोष नराजे हिंगणी बु., अतुल प्रल्हाद रेखाते हिवरखेड, श्याम भगवान वानखडे हिवरखेड यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
खरीप पूर्व आढावा सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी शेततळे अनुदान बाबत जिल्हा कृषी अधिकारी यांना किती शेतकरी अनुदान बाकी आहे असे विचारले असता निरंक उत्तर मिळाले त्यावर आमदार महोदयांनी शेतकरी म्हणून केलेल्या अर्जाचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याचे म्हणताच सभेतील शेतकरी अवाक झाले.. व सहज तोंडून शब्द निघाले आमदारांची हि परिस्थिती तर आपले काय❓