निट 2026 मध्ये अकोला जिल्ह्यात प्रथम.,देशात 252 वा क्रमांक(AIR ); सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, तेल्हारा च्या पार्थ यादगिरेचा भव्य गुणगौरव.
निट 2026 मध्ये अकोला जिल्ह्यात प्रथम.,देशात 252 वा क्रमांक(AIR ); सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, तेल्हारा च्या पार्थ यादगिरेचा भव्य गुणगौरव.
निट 2026 मध्ये अकोला जिल्ह्यात प्रथम.,देशात 252 वा क्रमांक(AIR ); सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, तेल्हारा च्या पार्थ यादगिरेचा भव्य गुणगौरव.

“असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रचिती देत सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ विलास यादगिरे याने RENEET-2026 परीक्षेत देशातून 252 वा तर अकोला जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले. या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेतर्फे पार्थ व त्याच्या आई-वडिलांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी पार्थ तसेच त्याचे आई-वडील विलास यादगिरे व सीमा यादगिरे यांचा शाल, श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल, संचालक विठ्ठलराव खारोडे, डॉ. विक्रम जोशी, प्रा. मोहन गांधी आणि प्रा. शरद मानकर यांनी पार्थच्या जिद्दीचे, परिश्रमाचे व यशाचे कौतुक करत त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यंदाच्या RENEET Exam 2026 परीक्षेला देशभरातून सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले होते. या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत देशात 252 वा आणि जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणे ही संपूर्ण तेल्हारा तालुका व अकोला जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे मान्यवरांनी सांगितले. दहावीच्या परीक्षेतही तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पार्थने सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाची परंपरा कायम राखली.
मनोगत व्यक्त करताना पार्थने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचा त्याग, त्यांचे संस्कार, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अभ्यासातील सातत्य यांना दिले. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत समाजसेवा करणे हेच माझे जीवनध्येय आहे, असेही त्याने नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष बेनिप्रसाद झुनझुनवाला, संचालक तथा स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे, अश्विनीताई खारोडे, विष्णू मल्ल, संचालक तथा प्राथमिक विभागाचे अध्यक्ष डॉ. विक्रम जोशी, संचालक ओमप्रकाश झुनझुनवाला, प्राचार्य गोपाल फाफट, पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे, तसेच पार्थचे आई-वडील उपस्थित होते.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष गावंडे यांनी केले.
पार्थच्या या अभूतपूर्व यशामुळे सेठ बन्सीधर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका सुवर्णपानाची भर पडली असून, विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणेचा दीपस्तंभ ठरला आहे.