श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना अध्यात्मविषयक मार्गदर्शन.
शिक्षण हा प्राकृतिक संस्कार आहे - भागवताचार्य निलेश महाराज जाणे.
शिक्षण हा प्राकृतिक संस्कार आहे – भागवताचार्य निलेश महाराज जाणे.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना अध्यात्मविषयक मार्गदर्शन.

आपण प्राप्त केलेली विद्या केवळ परीक्षेकरिता नसून , ती कायम आपल्या जीवनामध्ये स्थिर व्हावी त्याकरिता संयमी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात मात्र शिक्षणापेक्षा प्रशिक्षणावरच जास्त भर दिल्या जातो आहे. वास्तविक पाहता पुर्विच्याकाळी प्रशिक्षण पद्धती ही सर्कशीतील मनुष्येत्तर प्राण्यांकरिताच वापरल्या जाऊन त्या माध्यमातून त्यांच्याकडून मनुष्यवत कामे करून घेत लोकांची करमणूक केल्या जात होती. आता मात्र ती माणसांकरिता वापरून त्यांच्याकडून जनावरांसारखी कामे करून घेतल्या जात आहेत.प्रशिक्षण ही कृत्रिमता असून , शिक्षण हा प्राकृतिक संस्कार असल्याचे अभ्यासपुर्ण मत भागवताचार्य निलेश महाराज जाणे यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी आयोजित केलेल्या श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना अध्यात्मविषयक मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की,भीषण पाणीटंचाईच्या काळात एखादी विहीर दुसरीकडून आणलेल्या पाण्याने भरणे म्हणजे प्रशिक्षण आणि ती विहीर खोदून त्यात जिवंत पाण्याचा झरा निर्माण करणे म्हणजे शिक्षण होय. अलीकडच्या काळात बोकाळलेला भ्रष्टाचार हा प्रशिक्षण प्रणालीचे अनौरस अपत्य आहे. कारण अशिक्षिताला भ्रष्टाचार करता येत नाही , करायचाच झाल्यास तो केवळ श्रमाची बचतच करू शकतो.आणि जो सुशिक्षित आहे तो ते दुष्कृत्य करीत नाही. म्हणून भ्रष्टाचार सुशिक्षित किंवा अशिक्षित नव्हे तर , ज्यांचे रग्गड पगाराने पोट तर भरलेले आहे परंतु कधीही न संपणारी हाव असल्याने भूक मात्र अजून पर्यंत झालेली नाही अशा प्रशिक्षितांची उपज आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनियंत्रित हातात गेलेली शक्ती ही विश्वाच्या विकासाकरिता नाही तर, विनाशाकरिता कारणीभूत होत आहे. शिक्षण हे व्यष्टीच्या माध्यमातून समष्टीच्या हिताकरिता उपयोगाला आले तरच त्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होते अन्यथा नाही. म्हणून युवकांनी नुसते परीक्षार्थी न बनता ज्ञानार्जनाकरिता आजन्म विद्यार्थी बनून , तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञानाची जोड देत, अर्जित केलेल्या ज्ञानाचा चरितार्था बरोबरच चारित्र्य निर्मिती करिता उपयोग केला पाहिजे. असे सौदाहरण पटवून दिल्याचे शिबिर व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.