अकोला महाराणा प्रताप बागेत नवा पुतळा व सभागृह उभारणार.
उपमहापौर अमोल गोगे यांची पाहणी; प्रशासनाला तातडीचे निर्देश.
अकोला महाराणा प्रताप बागेत नवा पुतळा व सभागृह उभारणार.
उपमहापौर अमोल गोगे यांची पाहणी; प्रशासनाला तातडीचे निर्देश.

अकोला : सिटी कोतवालीजवळील महाराणा प्रताप बागेतील श्री. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याने येथे नव्या पुतळ्यासह मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमहापौर अमोल गोगे यांनी महापालिका प्रशासनास दिले आहेत.
महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने पुतळ्याची दुरवस्था व बागेतील सुविधांचा अभाव याबाबत निवेदन प्राप्त होताच उपमहापौर गोगे यांनी मंगळवारी (दि. १०) महाराणा प्रताप बागेची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान विद्यमान पुतळा जीर्ण अवस्थेत असून हार अर्पण व पूजेसाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आले. तसेच नागरिकांसाठी शौचालय, स्नानगृह तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी छोटे सभागृह नसल्याचेही स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर महाराणा प्रताप बागेत श्री. महाराणा प्रताप यांचा नवा पुतळा उभारण्यात यावा. पुतळ्याजवळ हार अर्पणासाठी सुरक्षित सिडी व पक्के बांधकाम करावे. यासोबतच येथे छोटे सभागृह उभारून शौचालय व स्नानगृहाची सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश उपमहापौर अमोल गोगे यांनी प्रशासनाला दिले. या सर्व कामांना प्राधान्य देत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
महाराणा प्रताप सेवा समितीचे निवेदन –
शुक्रवारी महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने पृथ्वीराज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली समाज बांधवांनी नवनिर्वाचित उपमहापौर अमोल गोगे व संजय गोटफोडे यांना महाराणा प्रताप बागेतील विद्यमान पुतळा जीर्ण झाल्याबाबत तसेच बागेत आवश्यक सुविधांचा अभाव असल्याबाबत निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेत उपमहापौर अमोल गोगे यांनी मनपाच्या कनिष्ठ अभियंत्यासह बागेची पाहणी केली. यावेळी समितीच्या मागण्या वाजवी असल्याचे नमूद करीत महापालिका प्रशासनाला याबाबतीत लवकरच सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी दिले.