वारी येथील बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठ्याचे बांधकाम तातडीने बंद करा ! नागरिकांचे तेल्हारा तहसीलदारांना निवेदन.
वारी येथील बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठ्याचे बांधकाम तातडीने बंद करा ! नागरिकांचे तेल्हारा तहसीलदारांना निवेदन.
वारी येथील बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठ्याचे बांधकाम तातडीने बंद करा ! नागरिकांचे तेल्हारा तहसीलदारांना निवेदन.

तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथे बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम तातडीने थांबवून त्यावर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन तेल्हारा तालुक्यातील शेतकरी व स्थानिक नागरिकांनी 23 जानेवारीला तेल्हारा तहसीलदारांना दिले.
बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेंतर्गत तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड परिसरात पाणीशुद्धीकरण प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, हे काम कायद्याच्या व प्रशासकीय नियमांच्या स्पष्ट उल्लंघनातून सुरू असल्याचे निवेदन करण्यात आले आहे. या योजनेला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.
या बाबत तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले त्यानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार विदर्भपाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांनी ४ मार्च २०२३ रोजी शासननिर्णय अन्वये (वान प्रकल्पातील बिगर सिंचन आरक्षण तसेच बाळापूर येथील ६९ गाव पाणीपुरवठा योजनेस दिलेले आरक्षण रद्द ठेवण्याबाबत) सदर प्रकल्पास स्पष्ट स्थगिती लागू केली होती. तसेच त्या पत्रावर “मूळ पत्र कार्यकारी संचालक यांची मान्यता” असल्याचे स्पष्ट असतानाही, प्रत्यक्षात संबंधित यंत्रणांकडून बांधकाम सुरू ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय, स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही ठरावीक परवानगी न घेता बांधकाम सुरू करण्यात आले असल्याची बाब काहींनी निदर्शनास आणून दिली तशी प्रसिद्ध झालेल्या बातमीतूनही स्पष्ट झाले आहे. सदर बाबीनुसार, ग्रामपंचायतीचा ठराव नसताना व तृतीय पक्ष कंपनी व ठेकेदाराच्या मनमानीने काम सुरू असल्याचे नमूद आहे. ही बाब महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, ग्रामपंचायत अधिनियम तसेच जलसंपदा विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणारी असून, यामुळे वान धरणावर अवलंबून असलेल्या तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचन हक्कांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, परिसरात सामाजिक असंतोष व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे बांधकाम बंद करून हे बांधकाम करणाऱ्यांवर तातडीने दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या – बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध बांधकाम तत्काळ थांबविण्याचे आदेश द्यावेत, शासन निर्णय व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या पत्राचे उल्लंघन करून काम सुरू ठेवणाऱ्या संबंधित अधिकारी, ठेकेदार व यंत्रणांवर कायदेशीर कार्यवाही करावी, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून लेखी खुलासा अर्जदारांना देण्यात यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर ज्ञानेश्वर हरीदास नराजे, उमेश शिवहरी कोरडे, अनिल रामदास नराजे, हरीदास भगवान वाघ, शिवशंकर अनंतराव कोरडे, गणेश हरीराम कोरडे, प्रविण एकनाथ कोरडे, अनंत दादाराव तळोकार,दिपक सुरेश वाघ,अरुण दादाराव गावंडे, सुभाष सुखदेव कोरडे सह नागरिक शेतकरी यांच्या शेकडो सह्या आहेत.