संस्कारितांच्या संरक्षणासाठी नृसिंह अवतार – निलेश महाराज जाणे.
श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरा
संस्कारितांच्या संरक्षणासाठी नृसिंह अवतार – निलेश महाराज जाणे.

संस्कारहीन लोकसंख्येचा भस्मासुर दिवसेंदिवस अक्राळ विक्राळ रूप धारण करीत असून ; तो अगदी भस्मासुराप्रमाणेच जन्मदात्याच्याच मुळावर उठतो आहे. परिणामी वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा दिवसागणिक वाढीस लागते आहे. याउलट संस्कारी संतती हीच म्हातारपणाची सांभाळण्याची व्यवस्था होत असते. किंबहुना त्या संस्कारीतांच्या संरक्षणासाठी भगवंताने नृसिंह अवतार धारण करून भक्त प्रल्हादाचे हिरण्यकश्यपाच्या जाचा पासून संरक्षण केले . असे अभ्यासपूर्ण म भागवताचार्य निलेश महाराज जाणे यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या कुशल मार्गदर्शनामध्ये आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना नृसिंह जयंतीच्या पर्वकाळावर विद्यार्थ्यांना भक्त प्रल्हादाचे जीवन चरित्र सांगत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृती ही बहुपुत्रत्वाची नाही तर ; संस्कारीत संततीची पुरस्करती आहे. म्हणूनच कौरवांसारख्या शतपुत्राची माता आसणाऱ्या गांधारीला अखेरीस मुखाग्नि देण्याकरिता एकही पुत्र नव्हता .
परंतु माता कुंतीच्या सुसंस्कारात वाढलेल्या पांडवांकडे मात्र द्वारकाधीश असणारे भगवान प्रत्यक्ष सेवा देत असल्याचे पौराणिक इतिहासात नमूद आहे.
असे अनेक पौराणिक व ऐतिहासिक दाखले देऊन त्यांनी विद्यार्थी व पालकांना संस्काराचे महत्त्व पटवून दिल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.