अकोला जिल्ह्याच्या राजकारणातला ‘निर्मोही संत’ : भाई प्रदीपबाप्पू देशमुख…उमेश अलोणे, अकोला
अकोला जिल्ह्याच्या राजकारणातला 'निर्मोही संत' : भाई प्रदीपबाप्पू देशमुख...उमेश अलोणे, अकोला
अकोला जिल्ह्याच्या राजकारणातला ‘निर्मोही संत’ : भाई प्रदीपबाप्पू देशमुख…उमेश अलोणे, अकोला

प्रसंग पहिला…. २०१५ मधील डिसेंबर महिना… अकोल्यात विधान परिषद निवडणुकीचा ‘माहौल’ एकदम शिखरावर होता. या निवडणुकीतले अनेक ‘मतदार’ आपल्या मताची ‘बोली’ लावत होते. दोन लाख…. तीन लाख लाख… अन पाच लाखही… समोरच्या उमेदवारांनाही हे सारं अपेक्षितच होतं… ‘त्या’ उमेदवारांची माणसं ,अशीच ‘बाप्पूं’कडेही गेलीत… बाप्पूंचं राजकारणातलं ‘नाव’, दरारा अन ‘वट’ही मोठा… त्यात ते ‘गटनेते’ही होते… त्यामुळे ‘त्या’ उमेदवारानं आपल्या माणसांकडे ‘बाप्पूं’साठी दिलेली रक्कम इतरांपेक्षा मोठी अन जास्त होती. त्यांना काय माहित बाप्पू काय रसायन आहे ते?…
‘ती’ माणसं बाप्पूंकडे गेलीत. त्यांनी ‘त्या’ उमेदवाराचा मतदान आपल्यालाच करायचा ‘निरोप’ही ‘बाप्पूं’ना सांगितला. जातांना भलंमोठं एक ‘ पाकीट’ बाहेर काढलं. ते बाप्पूंकडे देण्याचा प्रयत्न करणार तोच बाप्पूंचा त्यांना प्रश्न… “हे काय आहे?”… त्यांचं उत्तर होतं, ‘शेठ’कडून पाठविलेली ‘छोटीशी’ भेट आहे. तुमच्याकडे असु द्यात… ‘बाप्पू’ विनम्रतेने मात्र तेव्हढ्याच करारीपणाने उत्तरलेत, “हे तुमच्याकडेच असु द्यात. माझ्या पक्षाचा निर्णय तुमच्या साहेबांना मतदान करायचा झाला आहे. त्यामूळे तुमच्या साहेबांना सांगा की, मी मतदान त्यांनाच करणार आहे. या ‘पाकीटा’ची काहीही गरज नाही. अन हो!, निवडून आल्यानंतर माझ्या मतदारसंघातील एखाद्या कामासाठी मला निधी लागला तर ‘साहेबांना’ अगदी हक्काने मागेल”.
‘ती’ माणसं अगदी आश्चर्य अन विस्मयानं ‘या’ अवलियाकडे पाहतच राहिलीत. कारण, या निवडणुकीत स्वत:च्या मताची बोली लावतांना अनेकांनी स्वत:च्या मताचा केलेला ‘सौदा’ त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. अशा परिस्थितीत पैसे नाकारणारा माणूस पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अन ‘त्या’ माणसाबद्दल त्यांचा आदरही तेव्हढाच वाढला. त्यांनी हात जोडत त्यांचा निरोप घेतला. हा प्रसंग जेंव्हा ‘त्या’ उमेदवाराला समजला तेंव्हा त्यानंही मनोमन ‘बाप्पूं’च्या निष्ठेला हात जोडलेत. एक रूपयाही न घेता बाप्पूंनी या निवडणुकीत मतदान केलं. अन त्यांनी मतदान केलेला ‘तो’ उमेदवारही जिंकला… ‘इमान’ विकणाऱ्यांच्या ‘भाऊ’गर्दीत स्वत:ची तत्व अबाधित ठेवलेला हा ‘मतदार’ तेंव्हा लोकशाहीचा झेंडा निष्ठेनं खांद्यावर घेऊन उभा होता.
प्रसंग दुसरा… ३ नोव्हेंबर २०१९… अकोल्यातील प्रमिलाताई ओक सभागृह अगदी खचा-खच भरलं होतं. निमित्त होतं ‘बाप्पूं’च्या ‘एकसष्टी सोहळ्या’चं… हा कार्यक्रम काही त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केला नव्हताय. तर हा कार्यक्रम आयोजित केला होता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अन त्यांच्यावर प्रेम करीत असलेल्या त्यांच्या मित्रांनी… कार्यक्रमाला जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ‘बाप्पूं’चं कौतूक करायला महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील शिलेदार चंद्रकांत वानखडे आणि विजय विल्हेकर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक वक्तत्याच्या भाषणांनं वातावरण भावूक होत होतं. अनेकांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या.
‘बाप्पूं’ना तर उत्तर देतांना शब्दही फुटत नव्हते. त्यांचा दाटलेल्या कंठ अन गलबलून आलेल्या भावनाच आपलं कार्य भरून पावल्याची भावना ते बोलून गेलं. ‘ओक हॉल’च्या ‘भिंतींनीही यापूर्वी वेदना, संवेदना, माणुसकीचा गहिवर असलेल्या इतक्या संमिश्र अन जगावेगळ्या भावनांचा असा सोहळा अलिकडे कधी अनुभवलाच नव्हता. बाप्पू’ अकोला पंचायत समितीचे पाच वर्ष उपसभापती असतांना त्यांनी राबविलेल्या ‘शैक्षणिक पॅटर्न’ची राज्यात चर्चा झाली होती. त्याचवेळी आभाळभर कामाची संधी मिळालेल्या शिक्षकांनी ‘बाप्पूं’च्या ‘एकसष्टी’चा हा ‘सोहळा’ घडवून आणला होता. एकदा राजकीय माणसाची ‘टर्म’ संपल्यानंतर त्याच्याकडे ढुंकूनही न पाहण्याचं वातावरण असतांना ‘बाप्पूं’चा सत्कार सोहळा त्यांच्या कार्याचं वेगळेपण सांगणारा होता.
या ‘बाप्पुं’बद्दल तुम्हालाही उत्सुकता लागली असेल की, अखेर कोण आहेत हे ‘बाप्पू?’… हे बाप्पू म्हणजे अकोला जिल्ह्याच्या राजकारणाला लाभलेला एक निर्मोही, संत, सज्जन, संवेदनशील अन राजकारणाच्या चिखलाचा एकही ‘डाग’ न लागलेला सच्चा माणूस… ‘भाई’ प्रदीपबाप्पू देशमुख… गेली साडेचार दशकं या माणसानं अकोला जिल्ह्याचं राजकारण गाजवलं. आयुष्याच्या सुरूवातीपासून ते अगदी आजपर्यंत ‘शेतकरी कामगार पक्ष’ म्हणजेच ‘शेकाप’चा झेंडा निष्ठेनं आपल्या खांद्यावर वाहणारा हा तत्वनिष्ठ कार्यकर्ता. तीनवेळा अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य, एकवेळा पाच वर्षं अकोला पंचायत समितीचे उपसभापती अशी दैदिप्यमान राजकीय कारकीर्द. मात्र, राजकारणात एव्हढा काळ घालविलेले बाप्पू आजही अगदी तसेच ‘फकिर’ आहेत.
गांधीग्रामजवळचं गोपाळखेड हे बाप्पूंचं गाव. आजही गोपाळखेडवरून अकोल्याचा प्रवास बाप्पू बस किंवा काळीपिवळीने करतात. बाप्पूंनी राजकारणात साधा ‘खडकू’ही कमावला नाही. मात्र, कमावला तो लोकांचा अढळ विश्वास अन जगावेगळा आदर. आपल्या एका सहीनं या माणसानं अनेकांना नोकऱ्या मिळवून दिल्यात. अनेकांना योजना दिल्यात… कित्येकांना घरं मिळवून दिलीत. मात्र, तीच सही करून त्याचा लाभ ना कधी घरच्यांना दिला, ना नातेवाईकांना. त्यामुळेच बाप्पू अनेक वर्ष गोपाळखेडमधल्या आपल्या वडिलोपार्जित घरातच राहिलेत. मात्र,एव्हढी पदं लोकांनी दिलेल्या या नेत्यांनं त्यातील पैशांची साधी विटही आपल्या घराला लावली नाही.
बाप्पू!, आमच्या पिढीनं कधी लालबहादूर शास्त्री पाहिले नाहीत. आम्ही कधी सुदामकाका देशमुख, वर्ध्याचे रामचंद्र घंगारे काका पाहिले नाहीत. आमच्या पिढीने दत्ता पाटील, भाई उद्धवराव पाटील, दि. बा. पाटील, प्रा. एन. डी. पाटील, गणपतआबा देशमुख अनुभवले नाहीत. मात्र, आम्हाला ही नि:स्पृहता तुमच्या रूपानं आजही पाहता अन अनुभवता येते. राजकारणात आणखी ‘इनिंग’ खेळायची संधी असतांना तुम्ही तरूणाईला, नव्या पिढीला संधी मिळावी म्हणून स्वत: थांबलात. अलिकडे राजकारण हा कायम ‘घेण्याचा’, ओरबाडण्याचा धंदा झालेला असतांना तुमच्या ‘दातृत्वा’ची ओंजळ आजही समाजाला ‘देती’च आहे. तुम्ही राजकारणात थोडी तरी ‘ॲडजस्टमेंट’ केली असती तर तुम्ही तहहयात आमदार राहिले असते अन मंत्रीही झाले असते. मात्र, तुमच्यासाठी तुमचा ‘लाल बावटा’, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर जनताच या पदांपेक्षा मोठी होती.
अकोल्याच्या राजकारणानं जिल्ह्यात नेतृत्वाच्या प्रचंड क्षमता असलेल्या काही लोकांवर प्रचंड अन्याय केला आहे. प्रदीप बाप्पूंचं नाव त्यात सर्वात वर असलेल्या लोकांपैकी एक आहे. पण, या व्यक्तीनं कधीच याचा दोष लोकांना दिला नाही. तर कायमच आपलं लोकसंग्रहाचं, मैत्री अन माणुसकी जपण्याचं ‘वेड’ अगदी जिवापाड जपलं. ‘बाप्पू’ कधी आमदार होवू शकले नसले, तरी या माणसानं त्यांच्याशी जुळलेल्या प्रत्येकाच्या ह्रदयात आपल्यासाठी एक ‘खास’ असं ‘दार’ निर्माण केलंय. त्यामूळे आपल्या कर्तृत्वाने अन नावाने ‘बाप्पू’ जनतेत आजही तेवढेच ‘नामदार’ आहेत. एकदा उद्योगपती रतन टाटांनी शरद पवारांचा उल्लेख ‘देशाला कधीच न लाभलेला सर्वोत्तम पंतप्रधान’ असा केला होता. बाप्पूंनाही ‘अकोला जिल्ह्याला कधीच न लाभलेला सर्वोत्तम आमदार’ म्हणता येईल..
बाप्पू!, अलिकडचा काळ समाजासाठीचा ‘संक्रमन काळ’. अलिकडच्या काळातील राजकारणातील रोजच्या घटनांनी समाजमन पार ढवळून निघत आहे. अशा परिस्थितीमूळं सारं आकाशच अंधारून गेलं असं वातावरण आहे. मात्र, तूमच्यासारखे या अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरणारे काही दुवे समाजात आहेत. त्यामूळेच आजही समाजात सकारात्मक विचार, चांगुलपणा टिकून आहे. विचारांचा वारसा जपणारं तुमचं नाव अलिकडच्या काळातील गल्लाभरू राजकारण्यांच्या गर्दीत आजही तेजानं अन अभिमानानं आपलं स्वत्व टिकवून आहेत.
आज बाप्पूंचा वाढदिवस… सध्या राजकारणाच्या स्वार्थानं अन सत्तांधतेनं अंधारलेल्या वातावरणात तुमच्यासारखी ‘बाप’ माणसं एका ‘पणती’सारखी भासतात. कारण!, ही ‘पणती’ हा संपुर्ण अंध:कार निश्चितच हटवू अन मिटवू शकणार नाही. मात्र, ती चाचपडणाऱ्या लोकांना प्रकाशाचा ‘मार्ग’ निश्चितच दाखवू शकेल. तुमचं जगणं, तुमचा संघर्ष, विचारांवरची अविचल निष्ठा, तुमची वेदना अन संवेदना ही समाजाला बळ देणारी आहे. यातूनच उद्याची पहाट नक्कीच नव्या आशा-आकांक्षा अन चांगुलपणाला जन्म देणारी असेल. बाप्पू!, तुमच्या संघर्ष, विचार आणि संस्कारांना शतश: नमन!. बाप्पू!, खुप-खुप जगा… वाढदिवसाच्या आरोग्यदायी आभाळभर शुभेच्छा…
भाई प्रदीपबाप्पू देशमुख यांचा संपर्क क्रमांक : +919767457505
@उमेश अलोणे,
अकोला.