श्रीकृष्णावतार भक्तांचे ऋण फेडण्याकरिता झाला – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्रीकृष्ण लीलामृत ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रथम पुष्प.
श्रीकृष्णावतार भक्तांचे ऋण फेडण्याकरिता झाला – श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्रीकृष्ण लीलामृत ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रथम पुष्प.

सृष्टीचा आरंभापासून आजतागायत भगवंताने विविध कारणांनी अनेक अवतार या अवनितलावर धारण केले. निष्काम भक्त असणारे वसुदेव- देवकी , नंद – यशोदा तसेच अनेकांनी भक्तांचे ऋण फेडण्याकरिताच भगवान श्रीकृष्णरूपाने अवतरीत झाल्याचे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्रीकृष्ण लीलामृत ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रथम पुष्पगुंफीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वसुदेव- देवकी यांनी पूर्व जन्मामध्ये सुतपा आणि पृश्नि रूपाने संतती प्राप्ति करिता ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून अन्न पाणी वर्ज करून सुनंदा नावाच्या नदीच्या तटावर एक मन्वंतर कालपर्यंत साधना केली. तपश्चर्येअंती भगवंतांच्या प्रसन्नतेनंतर त्यांनी आम्हास आपल्यासमान मुलगा व्हावा असा वर मागितला. तेव्हा प्रथम भगवान पृश्निगर्भ नावाने त्यांच्या उदरी अवतरीत झाले . परंतु त्यांचे समाधान न झाल्यामुळे तेच कश्यप आणि अदिती रूपाने जेव्हा पुनश्च जन्माला आले त्यावेळी त्यांच्याकडे भगवान बटूंचे रूप धारण करून वामन रूपाने अवतरीत झाले. तेव्हाही त्यांना संतुष्टता प्राप्त न झाल्यामुळेच तेच पुन्हा जेव्हा वसुदेव – देवकी रूपाने तिसऱ्यांदा या पृथ्वीतलावर आले त्यावेळी भगवंतांनी त्यांच्या उदरी अंश , अंशांश , आवेश , कला , पुर्ण नव्हे तर , सामर्थ्यासह स्वातंत्र्य असणाऱ्या श्रीकृष्ण रूपाणे परिपूर्णतम् अवतार धारण करुन , त्यांचे ऋण फेडणे या एका कार्याकरिता अवताराला येऊन कोट्यावधी कार्य संपादन केले असे भगवंताच्या दशावतारातील सहा प्रकारांच्या गर्गसंहितेनुसार व्याख्या सांगून उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.