तणनाशक फवारणी करूनही तण हिरवेगारच.
शेतकरी गजानन गायकवाड यांची फसवणूक झाल्याची तक्रार.

तेल्हारा येथील शेतकरी, भाजपाचे तेल्हारा तालुका उपाध्याय गजानन गायकवाड यांनी निश्चिनो कंपनीचे नऊ हजार रुपये किमतीचे स्टीग्मा बुस्ट व स्टीग्मा स्प्रेड स्टिकर आणि ऍक्टिवेटर शिपू याची जमिनीत भरपूर ओलावा असतांना 30 जुन रोजी सोयाबीनच्या शेतात फवारणी केली. तणनाशकाचे प्रमाण सुद्धा कंपनीने सांगितले तेवढेच घेतले. फवारणी करून आठ दहा दिवसानंतर सुद्धा त्यांच्या शेतातील तण जळाले नाही वा त्यावर काहीच परिणाम दिसून आला नाही. याबाबत गजानन गायकवाड यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेताची पाहणी करण्यासाठी बोलावले असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिली व पुन्हा फवारणी करावी लागेल असा आगाऊचा सल्ला दिल्याने शेतकऱ्याच्या नाकेनऊ झाले.

शेतकरी गायकवाड यांचा अगोदरच फवारणी औषधीचे नऊ हजार व फवारणीचे तीन हजार असा एकूण बारा हजार रुपये खर्च झाला आहे. शेतीचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामध्ये ह्या कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करताना दिसत आहेत याला कुठेतरी आळा बसावा व संबंधित कंपनीवर कठोर कारवाई व्हावी आणि इतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी. झाल्या प्रकाराची शेतकरी गजानन गायकवाड यांनी कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांच्याकडे बिलासह लेखी तक्रार केली आहे.