Uncategorized

वारकरी संप्रदायाचा भक्ती निर्झर, पंढरीची वारी

श्री ज्ञानेश्वरदासानुदास भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

वारकरी संप्रदायाचा भक्ती निर्झर, पंढरीची वारी –
श्री ज्ञानेश्वरदासानुदास
भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या भगवान पंढरीशांच्या दर्शनार्थ आबाल वृद्धांना घेऊन भू वैकुंठ पंढरीक्षेत्राकडे प्रस्थान करणारी वारकरी संप्रदायाची पायी वारी ही प्रदीर्घ अर्थातच आदी गुरु शंकरांपासून गंगा प्रवाहाप्रमाणे अनस्यूतपणे चालत आलेली अनवरत परंपरा आहे. तिच प्रचाराचे मुख्य माध्यम तथा समाजोध्दाराचे सुद्धा लोकाभिमुख सुलभ असे साधन आहे. किंबहुना पंढरीची पायी वारी हाच वारकरी संप्रदायाचा भक्तिनिर्झर आहे.
ज्या कालखंडात यातायातीचे साधन व प्रसिद्धीचे कोणतीही माध्यम उपलब्ध नव्हते त्यावेळी संप्रदायाच्या द्रष्ट्या संतांनी याच पायी वारीच्या माध्यमातून समाजाचे सुखदुःख व अडीअडचणी जाणून घेत , विचार विनिमय केला. अर्थातच त्या माध्यमातून देवाण घेवाणीचा व्यापार नव्हे तर , विचारापासून तर विकासापर्यंत सर्वच गोष्टीच्या आदान प्रधानाची निस्वार्थ परंपरा निर्माण केली. ज्याच्याकडे भरपूर आहे त्याच्याकडून घेऊन ज्याच्याजवळ काहीच नाही त्यांना देण्याची कुठल्याही शासकीय हस्तक्षेपाशिवाय समाजातून समाजाकरिता सुव्यवस्था निर्माण केली. त्यातूनच समाजातील शोषित व संपन्नातील दरी कमी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे देवाच्या कार्यकरिता दिले म्हणून देणारा श्रीमंत सुखी व प्रसाद म्हणून मिळाले या कारणाने घेणारा ह्रीमंत ( लोक व शास्त्र यांच्याविरुद्ध आचरण करण्याची लाज वाटणारा ) सुद्धा सुखी झाला. अर्थातच देणाऱ्याच्या अंतःकरणात दातृत्वाचा अहंकार नाही . म्हणूनच तो नम्रता पूर्वक नमस्कार करून प्रेमाने देतो . विशेष म्हणजे घेणाऱ्याच्या अंत:करनात सुद्धा हिनतेचा भाव निर्माण न होता तो देवाचा प्रसाद मिळाला म्हणूनच त्याचा सप्रेम स्वीकार करतो. या शास्त्रोक्त परंपरेमुळेच वर्षानुवर्ष अखंडपणे देऊन सुद्धा देणाऱ्याचे दिवाळे निघून तो अजून पर्यंत कुणीही दीन ( गरीब ) झाला नाही . उलट पक्षी तो दिवसेंदिवस श्रीमंतच झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. आणि घेणाऱ्या मध्ये हिनत्वाची भावना जन्माला येऊन त्यांनी हा पायी वारीचा मार्ग पण सोडला नाही.


विशेष म्हणजे साधुसंतानी यातूनच स्पृश्यास्पृश्य भेदभावाला पूर्णपणे मुठमाती देऊन , राजकीय नेत्यांप्रमाणे केवळ भाषणबाजीतून नव्हे तर , प्रत्यक्ष कृती अर्थात आचरणातून सामाजिक सलोखा निर्माण करून , आपण एका ईश्वराचीच लेकरे आहोत अशी विश्वबंधुत्वाची शिकवण दिली.
वारकरी संतांनी याच पायी वारीच्या माध्यमातून प्रत्येक वारकऱ्याची गीतोक्त कायिक ,वाचिक व मानसिक तपश्चर्या घडवून आणित देशिक , भाषिक व प्रादेशिक ऐक्य घडविण्याचे महत्कार्य केले, करीत आहेत व करीत राहतील हे त्रिकालाबाधित सत्य आहे. यामध्ये मनुष्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच सांस्कृतिक व सांपत्तीक आरोग्य अबाधित राखून , स्वयंशिस्त , स्वावलंबन , समता तसेच वेळ व पैशाच्या नियोजनाचे सुद्धा धडे गिरवून घेतले.
वैदिक परंपरेतील योगयागादिक व्यक्तिगत स्वरूपांच्यासाधनांना कालपरत्वे बदलवून भजन , हरीपाठ व कीर्तना सारख्या लोकसुलभ साधनांचे वारीच्या माध्यमातून वारकरी संतांनी सार्वजनिकरण करून निरुपद्रवी समाज निर्मिती करीत अध्यात्मिक साम्यवादाची मुहूर्तमेढ रोवली. भगवान श्री ज्ञानेश तुकारामादि वारकरी संतांनी जोपासलेल्या जागतिक आश्चर्य असणाऱ्या पंढरीची वारी या वारकरी संप्रदायाच्या भक्तिनिर्झरामध्ये आपणा सर्वांना अवगाहन करण्याचे सौभाग्य प्राप्त होवो हीच भगवान श्री ज्ञानेशांच्या प्रस्थान प्रसंगी भगवान पंढरीनाथांच्या चरणी शब्द पुष्प समर्पित करून विनम्र प्रार्थना .

श्री ज्ञानेश्वरदासानुदास
भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!