Uncategorized

मराठा समाज हातातून गेलाय का ?-पुरुषोत्तम आवारे पाटील. 

पुरुषोत्तम आवारे पाटील लेखक, पत्रकार, वक्ता

मराठा समाज हातातून गेलाय का ?-पुरुषोत्तम आवारे पाटील.

राज्यात सर्वाधिक लोकसंख्या असणारा मराठा समाज सतत कुठल्यातरी विषयाच्या अनुषंगाने चर्चेत असतो त्याचे कारण त्यांची असणारी संख्या आहे. मोठ्या समाजात घडणाऱ्या घटनांची चर्चा सुद्धा मोठीच होणे स्वाभाविक आहे. मराठा आरक्षण असो की शेतकरी आत्महत्यांचा विषय असो यात केंद्रस्थानी नेहमी मराठा समाज राहिला आहे. गल्ली ते दिल्ली सगळीकडे राजकारणात मराठा समाज आघाडीवर दिसतो आहे कारण इतर काही गोष्टी करण्यासारख्या आहेत हे हा समाज आजही विचारात घेत नाही. गावोगाव मराठा समाजाच्या राजकीय सहभागाने अनेक घटक जागृत झाले आहेत त्यामुळे लोकशाहीत असलेले हक्क आणि अधिकार मागण्याच्या चळवळी यातून सुरुवात झाल्या आहेत. यातून काही चांगल्या बाबी सार्वजनिक जीवनात सुरुवात झाल्या असल्या तरी मराठा समाजाने आता राजकारण कसे आणि किती करावे यावर मोठे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. या समाजातील शिक्षित तरुण वर्ग आता राजकारण बाजूला ठेवून इतर पर्यायांचा गांभीर्याने विचार करताना दिसतात हे चांगले लक्षण आहे.
महाराष्ट्राचे सार्वजनिक जीवन मराठा समाजाच्या भोवती फिरत असते हे जरी सत्य असले तरी ते पूर्ण सत्य नाही कारण अजूनही ८० टक्के मराठा समाज तुटपुंज्या शेतीवर अवलंबून आहे. गावोगाव मराठा तरुण,तरुणींच्या हाताला काम नाही. संपूर्ण गाव मराठ्यांचे असते मात्र त्या गावात गडगंज म्हणून केवळ बोटांवर मोजणारे लोक असतात इतर समाज घटक कशी बशी वाचलेली शेती कसत असतात. गावाचे पाटील म्हणून मिरवत असल्यामुळे घरात कितीही गरिबी आली तरी पडेल ती कामे करण्याची तयारी नसते ,या उलट पोटापाण्यासाठी जे समाज बाहेरून आले त्यांनी याच पाटलांच्या गावात काही वर्षात मोठमोठ्या इमारती उभ्या केल्या आहेत. रस्त्यावर वस्तू विकण्यापासून तर प्रासंगिक व्यापार करीत इतर समूहांनी व्यवहार जोपासले आहेत , गावातल्या निवडणुकात पुढे हाच बाहेरचा समाज गावातल्या पाटलांना व्याजाने पैसा पुरवायला लागला आहे. कुणी तोंडभरून पाटील म्हटले की शेपाचशे रुपयांचा चहानाश्त्यावर चुराडा करणारे पाटील आजही बघायला मिळतात.
कळते पण वळत नाही अश्या स्थितीत अनेक गावचा मराठा समाज येऊन ठेपला आहे. आपण जणू या समाजाचे नेतृत्व करायलाच जन्माला आलो आहोत असे समजून कोणत्याही नियोजन शिवाय निवडणूक आखाड्यात पडणारे अनेक मराठा तरुण कुणाच्या तरी इशाऱ्यावर राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसतात. त्याचा परिणाम सामाजिक जगण्यावर होत आहे. पाटील लग्न दणक्यात झालं पाहीजे असे कुणी म्हणण्याची सुद्धा अलीकडे गरज पडत नाही. कारण नसताना मुलीच्या लग्नात गावभोजन देताना या पाटलांचे तुटणारे टाके कुणाच्या नजरेत पडत नसले तरी नंतरची अनेक वर्ष पैश्यांची चणचण कूस बदलू देत नाही हे भीषण वास्तव आहे. सामाजिक दृष्ट्या मराठा अधिक प्रगत व्हावा यासाठी गेली तीन दशके मराठा सेवा संघ मोठे प्रयत्न करीत आहे मात्र त्यातून या समाजात किती सामाजिक बदल झालेत हे एकदा तपासून बघितले पाहिजे. अलीकडे मराठा समाजाच्या लग्नासाठी मराठा समाजाच्या संघटनांनी काही आचार संहिता जाहीर केल्या आहेत मात्र त्या कितपत पाळल्या जातात ?
वऱ्हाडात मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहरे यांनी अलीकडे लग्नात होणाऱ्या मोठे खर्च आणि कर्मकांडांवर प्रहार केले आहेत. त्यांनी समाजाच्या एका बैठकीत काही बंधने घालून दिली आहेत ती अतिशय उपयुक्त आहेत. अवाढव्य स्वरूपात असलेल्या लग्नात पाहुण्यांना बोलावण्यात येते आणि मंचावर गाणी सुरु असतात. निमंत्रित पाहुण्यांना परस्परांमध्ये बोलणे, विचार विनिमय, चर्चा करणे, सामाजिक अभिसरण सुलभ व्हावे म्हणूनलग्न समारंभात आर्केस्ट्रा अजिबात लावू नये. जमल्यास मंगल वाद्य म्हणजे सनई चौघडा लावावा, संगीत अगदी मंद आवाजात असावे याचे कोंत्येही भान ठेवले जात नाही यात सुधारणा होण्याची गरज आहे. दोनपेक्षा जास्त फोटोग्राफर्स ठेवू नयेत आणि फोटोग्राफर्सना मंचावर अवाजवी हस्तक्षेप करू देऊ नये.’प्री वेडिंग शूटिंग’ शक्यतो टाळावे.नवरा-नवरीला हार घालतांना वर उचलून धरू नये हा आचरटपणा थोरांच्या समोर होतो मात्र मुलांचा उत्साह म्हणून त्याकडे कानाडोळा होतो. लग्नात दिल्या जाणाऱ्याअहेराची खरोखर गरज आणि उपयोगिता आहे काय ? नसेल तर आहेर प्रथा बंद करावी. द्यायचीच असेल तर भेट वस्तू देण्याऐवजी पाकिटात रोख रक्कम द्यावी. लग्नामध्ये अवाजवी मेकअप, डेकोरेशन आणि खर्च टाळावेत, रुखवंत प्रथा बंद करावी.पुढे याची कोणतीही गरज भासत नाही हा प्रत्येकाचा अनुभव आहे.

नवरा किंवा नवरदेव ह्यांना आतिषबाजी करत आणि पर्यावरण दूषित करत, अवाजवी धोका पत्करून इव्हेंट करून मंगल कार्यालयात आणले जाते ,हे करताना अनेकदा अपघात झाले आहेत मात्र कुठेतरी सिनेमात बघितलेले हे इव्हेन्ट करण्याचा अट्टहास विनाकारण केला जातो तो बंद होण्याची गरज आहे. नवरी,नवरदेवाला आणायचेच असेल तर शालीनतेने फुलांच्या ताटीखाली सनई चौघडा, मंगल वाद्य वाजवत आणल्यास हरकत नाही. लग्नात हुंड्याने कोट्यवधींची उड्डाणे गाठली आहेत , मुलाच्या घरात सगळे काही असताना पलंग,गादी शुद्ध बेशरमपणे स्वीकारली जाणे कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हुंडा,भेटवसू नकोच इच्छा असल्यास मुलीच्या नावाने ‘एफडी’, म्हणजे मुदत ठेव करावी. जेवण्यात मोजता येणार नाहीत एवढे पदार्थ ठेवत श्रीमंतीचे प्रदर्शन अलीकडे वाढले आहे ,त्याची गरज आहे का ? लोक खरंच किती खातात आणि किती ताटात उष्टे ठेवतात ? सॅलड, डाळभाजी, एक किंवा दोन मोकळ्या भाज्या, पोळ्या किंवा पुऱ्या, भात, एखादे नमकीन किंवा भजे, स्वीट, पाणीपुरी असे पाच किंवा जास्तीत जास्त सात/आठ पेक्षा जास्त पदार्थ ठेवणे टाळावेत आणि घेणाऱ्यांनी सुद्धा अन्न वाया जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आरती म्हणण्याची प्रथा काही लग्नांमधे आजकाल सुरू केल्याचे निदर्शनास आलेआहे. छत्रपती शिवाजी महाराज हेदेव नव्हते, तर मनगटाच्या जोरावर तलवारबाजी करणारे महापराक्रमी, युगंधर योद्धा होतेः आरती केल्याने त्यांचा पराक्रम झाकोळल्या जातो. त्याऐवजी ठेवायचाच असेल तर लग्न समारंभामध्ये त्यांचा पुतळा किंवा फोटो ठेवून माल्यार्पण करून कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करणे किंवा पोवाडा लावणे, म्हणणे उचित आहे . आलेल्या पाहुण्यांमधील केवळ काही निवडक लोकांचीच नावे घेऊन त्यांची उपस्थिती जाहीर करणे आणि शाल-श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करणे, त्यांची भाषणे ठेवणे टाळावे कारण त्यामुळे लग्नाकरिता आलेल्या इतर पाहुण्यांचा अप्रत्यक्षरित्या अपमान होतो. त्याऐवजी सर्वच उपस्थितांचे केवळ शब्दसुमनांनी स्वागतकरावे अश्या अनेक सूचना मराठा समाजासाठी अनेक सामाजिक संघटनांनी केल्या आहेत परंतु आता चेंडू समाजाच्या कोर्टात आहे. अलीकडे समाजावर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही त्यामुळे , पैश्याची गुर्मी असलेले अनेक घटक आचारसंहिता लादणारे हे कोण लागून गेले टोपणजी ? असा स्वर काढण्याची शक्यता आहे. समाजावर नैतिक नियंत्रण ठेवणाऱ्या कुण्या व्यक्तीचे नाव सध्या शोधून सापडत नाही,समाज वंदनीय समाज घटकांच्या हातातून गेल्यात जमा आहे.
-पुरूषोत्तम आवारे पाटील
संवाद – 9892162248

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!