आपला जिल्हा

उच्च रक्तदाब हा ‘सायलेंट किलर’.

तपासणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

उच्च रक्तदाब हा ‘सायलेंट किलर’.
तपासणी करण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

अकोला, दि. १६ : उच्च रक्तदाब हा विकार कोणतेही लक्षण प्रकट न करता शरीरात कधी निर्माण होतो हे कळत नसल्याने त्याला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. त्यामुळे वेळीच तपासण्या व उपचार करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

रक्तदाबाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक उच्च रक्तदाब दिन दरवर्षी १७ मे रोजी साजरा होतो. सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते. धावपळीची जीवनशैली, कामाचे वाढलेले तास, धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयींमुळे अनेक तरुण-तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडतात. हा आजार अन्य गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे या आजाराची वेळीच माहिती करून घेणे आणि तणावमुक्त स्वस्थ जीवनमान आत्मसात करणे अत्यावश्यक बनले आहे.
रक्तवाहिन्यांमधून रक्त वाहून जाण्यासाठी लागणारा दाब म्हणजे रक्तदाब. आपल्या शरीरात रक्तसंचार करण्यासाठी दबावाची आवश्यकता असते. हा दबाव हृदयाच्या नियमित होणाऱ्या स्पंदनामुळे उपलब्ध होतो.

उच्च रक्तदाबाची कारणे – निष्क्रियता, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन, अति मानसिक ताण, आहारात मिठाचे प्रमाण अधिक , आनुवंशिक कारणे, जसे मधुमेह, थॉयराईड, किडनीचे विकार.

उच्च रक्तदाबाची लक्षणे – अंधुक दिसणे, वारंवार चिडचिड होणे, थकवा जाणवणे, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे, धाप लागणे, छातीत कळ येणे, वारंवार डोके दुखणे, डोके जड होणे.
दुष्परिणाम- रेटिनोपैथी (अंधत्व येणे), मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, अर्धांगवायू (लकवा), हृदयविकाराचा झटका.

सल्ला – नियमित व्यायाम (डॉक्टरच्या सल्ल्याने करणे), ताण-तणाव टाळावे, मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, जीवन शैलीमध्ये बदल करणे, सिगारेट, तंबाखू, मद्यपानाचे व्यसन न करणे, नियमित वैद्यकीय सल्ला घेणे, नियमित ब्लड प्रेशर तपासणे, नियमित ब्लड प्रेशरची औषधे घेणे (डॉक्टरच्या सल्ल्यानुसार), पुरेशी झोप घेणे.

प्रत्येक गाव, वाडी वस्ती येथील ग्रामस्थांची उच्च रक्तदाब तपासणी समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत मोफत केली जाते. सर्व शासकीय रुग्णालयात ईसीजी तपासणी विनामूल्य केली जाते. नागरिकांनी अशा सुविधांचा लाभ घेऊन तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी, डॉ. राधा जोगी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!