जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप.
जल व्यवस्थापनाचा जीवनशैलीत अंगीकार आवश्यक – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर.
जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप.
जल व्यवस्थापनाचा जीवनशैलीत अंगीकार आवश्यक – पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर.

अकोला, दि. ३० : जल व्यवस्थापनाची कृती केवळ पंधरवड्यापुरती मर्यादित न राहता जल व्यवस्थापनाचा जीवनशैलीत अंगीकार व्हावा, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश पुंडकर यांनी आज येथे केले.
जलसंपदा विभागातर्फे जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप कार्यक्रम नियोजन भवनात झाला, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. जिल्हाधिकारी अजित कुंभार, अकोला सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता योगेश दाभाडे, कार्यकारी अभियंता अमोल वसुलकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. फुंडकर म्हणाले, इस्त्रायल तसेच काही आखाती देशांमध्ये कमी पावसातही उत्कृष्ट नियोजनातून समृध्दी निर्माण करण्यात आली. त्या तुलनेत आपल्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे. त्याचा उचित वापर झाला पाहिजे. हजारो वर्षांच्या पावसाने जमिनीत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्याचा उपसा हानीकारक ठरेल. त्यामुळे पाण्याचा उचित वापर ही सवय व्हावी. कालव्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पाणी शेवटच्या बिंदुपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे स्वच्छतेत सातत्य हवे.पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत
पाणी वापर संस्थांमध्ये जागरूकता निर्माण करावी. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे जेणेकरून उन्हाळ्यात टंचाई निर्माण होणार नाही. जल व्यवस्थापनासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
’प्रत्येक थेंब अधिक उत्पादन’ या सूत्रानुसार शेती सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. त्याबाबत या जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी व जलसंपदा विभागाने समन्वयाने कार्य करावे, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सांगितले.
उपक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जलप्रतिज्ञाही घेण्यात आली. पंधरवड्यात कालवा स्वच्छता मोहीम, उपसा सिंचनाबद्दल तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, पाणी वापर संस्था संवाद आदी अनेक उपक्रम राबविण्यात आले, असे श्री. दाभाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.