जिल्हाधिका-यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी.
खरिप हंगामात जिल्हाभरात तपासणी.

अकोला, दि. २९ : खरीपपूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज शहरातील काही कृषी केंद्रांना भेट देऊन तपासणी केली.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी डॉ. तुषार जाधव, महेंद्र साल्के आदी उपस्थित होते.

शहरातील शहा एजन्सीज, पाटणी ट्रेडर्स, मिलींद एजन्सी आदी दुकानांना जिल्हाधिका-यांनी भेट देऊन उपलब्ध खते, बियाणे आदी साठा यांचा आढावा घेतला. दर्शनी भागात फलक लावणे, अभिलेख अद्ययावत करणे, साठा नोंदवही अद्ययावत करणे, तसेच उन्हाचे प्रमाण जास्त असल्यास शेतकरी बांधवांसाठी
सावलीची व पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
येत्या खरीप हंगामात आपण स्वत: रँडमली जिल्हाभरातील कृषी सेवा केंद्राची तपासणी करणार असल्याचेही जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यावेळी सांगितले.