अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निवेदन. NMEO-OS योजनेत समावेश व्हावा.

अकोला, 30 मार्च – अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियान (NMEO-OS) अंतर्गत जिल्ह्याचा समावेश करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी अधिकारी,अधिक्षक कार्यालयात केली आहे.
केंद्र सरकारने तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी सुरू केलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत 07 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अकोला जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
*भुईमुग उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महत्त्वाचा वाटा*
महाराष्ट्रासाठी NMEO-OS अंतर्गत 16,000 हेक्टर क्षेत्रावर भुईमुग लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, या योजनेसाठी केवळ आठ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून अकोला जिल्हा वगळण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात विशेषतः अकोट आणि तेल्हारा तालुक्यात भुईमुग उत्पादनासाठी अनुकूल मृदा आहे. तरीही, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, प्रक्रिया उद्योगांची कमतरता आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही.

*शेतकऱ्यांसमोर मोठ्या समस्या*
अकोला जिल्ह्यातील शेतकरी अनेक अडचणींना सामोरे जात आहेत.
– *जलसंधारणाचा अभाव:* मृदासंरचना खोल चोपण थरयुक्त असल्यामुळे बोअरवेल आणि विहिरींवर मर्यादा येतात. जलसंधारण प्रकल्प आणि पुनर्भरण प्रणाली आवश्यक आहेत.
– *वन्यप्राणी हल्ले:* शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षण उपाययोजना करणे गरजेचे आहे.
– *प्रक्रिया उद्योगांचा अभाव:* तेलबिया खरेदी केंद्रे आणि प्रक्रिया उद्योग नसल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही.
*शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या*
शेतकऱ्यांनी पुढील मागण्या सरकारकडे मांडल्या आहेत:
– अकोला जिल्ह्याचा NMEO-OS योजनेत समावेश करावा.
– जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य द्यावे.
– तेलबिया प्रक्रिया उद्योग आणि शेतकरी उत्पादक गट (FPOs) स्थापन करावेत.
– शेतकऱ्यांसाठी विशेष बियाणे साठवणूक युनिट्स, कापणीपश्चात मूल्यसाखळी समर्थन आणि तेल काढणी युनिट्ससाठी अनुदान द्यावे असे निवेदन शेतकरी सतीश बोंद्रे (शिवपूर), वैभव अहेरकर (तेल्हारा), किशोर तळोकार (अकोट), अविनाश सुरत्ने (शहापूर) आणि नंदकिशोर वाघमारे (बोर्डी) यांनी दिले आहे.
अकोला जिल्ह्याचा NMEO-OS योजनेत समावेश होणे अत्यंत आवश्यक आहे. भुईमुग लागवडीसाठी पोषक असलेल्या जमिनीसह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादक शेतकरी आहेत. जर शेतकऱ्यांना अनुदान, उच्च दर्जाची बियाणे आणि प्रक्रिया उद्योगांसाठी सहाय्य मिळाले तर जिल्हा तेलबिया उत्पादनात मोठी वाढ करू शकेल. अकोल्याला वंचित ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
सतिश बोंद्रे,शिवपूर