शास्त्र सिद्धांत पचवून निर्माण झालेले काव्य गाथा.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ.

सामान्यतः आपण ज्याप्रमाणे फुटाणे किंवा शेंगदाणे खाऊन पचवू शकतो त्याप्रमाणे सुकामेव्यातील बदाम आधी पदार्थ सहज खाऊन पचविनाची क्षमता आपल्या जठरात नसते. त्याकरिता त्या पौष्टिक पदार्थांवर आधी रात्रभर पाण्यात भिजवून तदनंतर साजूक तुपाबरोबर परतवून घेत त्याचा स्वादिष्ट शिरा बनवून खावा लागतो तरच तो पचत असतो.
लहान बालकांना तर तो शिरा सुद्धा पचत नाही त्याकरिता त्याची माता तो स्वतः खाऊन पचविते आणि त्याचे दुधात रूपांतरण करून तद्वारा त्या बालकाचे योग्य रीतीने पोषण करीत असते. तद्वत वेदशास्त्रादी संस्कृत प्रचुर ग्रंथातील तत्त्वज्ञान हे बदाम बिजाप्रमाणे पौष्टिक तर आहे परंतु सहज पाचक मात्र नाही. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या मातृहृदयी संतांनी ते तत्वज्ञान आधी स्वतः पचविले व अभंग रुपी दुधाच्या द्वारा ते स्वमुखातून निश्रृत करून तुम्हाला सर्वसामान्यजना करिता शब्दबद्ध करून ठेवले. म्हणून त्यांची अभंग वाणी हे शास्त्र सिद्धांत पचवून निर्माण झालेले लोकोद्धारक महाकाव्य आहे. असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी व्यक्त केले.
ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम श्रीक्षेत्र वारी भैरवगढ येथे आयोजित गाथा पारायण तथा प्रवचन ज्ञानयज्ञ सप्ताहातील चतुर्थ पुष्प गुंफित असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जे ना देखील रवी ते देखील कवी असा मराठीमध्ये वाक्प्रचार असून , जगद्गुरु तुकोबाराय हे नुसते कवी नसून अनुभवी असल्यामुळे जे ना देखे कवी ते देखे अनुभवी असे म्हणावे लागेल. म्हणून वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर गाथेला तुका पंचम तो वेद असे सार्थपणे संबोधायचे . तसेच संपूर्ण संप्रदाय गाथेला तुकोपनिषद् या नावाने गौरवान्वित करीत असतो. ज्यांना बेरीज करता येते त्याला संपूर्ण गणित येथे असे म्हणता येत नाही कारण गणितात फक्त बेरीजच नाहीत वजाबाकी, गुणाकार, भागाकार आदींचाही त्यात समावेश असतो . तद्वत नुसते यमक जोडता आले म्हणून कवी आणि कवित्व करता येते म्हणून संत असे म्हणता येत नाही. तर कवित्व हे अनुभवपूर्ण , उद्बोधक , वास्तववादी व परतत्वस्पर्शी असावी लागते. हे सर्वच गुण एकत्रितरित्या संत वांङ्गमयाव्यतिरिक्त इतरत्र कुठेही पाहण्याकरिता मिळत नाही. असे अनेक तौलनिक उदाहरणांद्वारे महाराजांनी पटवून दिले.यावेळी सदिच्छा भेटीला आलेले माजी उपजिल्हाधिकारी श्रीयुत अशोकजी अमानकर साहेब उपस्थित होते.तसेच काल रात्री श्री.ह.भ.प.गौरव महाराज माळी यांनी सकल संताचे चरीत्र संक्षिप्त स्वरुपात आपल्या किर्तनात मांडुन किर्तन सेवा संपन्न केली. असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.