नायब तहसीलदारांचा शेत शिवारातच न्याय निवाडा. रस्ता वाद सामंजस्याने सुटला; शेतकऱ्यांना दिलासा, गावकऱ्यांमध्ये समाधान.
नायब तहसीलदारांचा शेत शिवारातच न्याय निवाडा. रस्ता वाद सामंजस्याने सुटला; शेतकऱ्यांना दिलासा, गावकऱ्यांमध्ये समाधान.
नायब तहसीलदारांचा शेत शिवारातच न्याय निवाडा.
रस्ता वाद सामंजस्याने सुटला; शेतकऱ्यांना दिलासा, गावकऱ्यांमध्ये समाधान.

तेल्हारा तालुक्यातील मौजे थार शिवारात विठ्ठल चांगदेव गावंडे व इतर 5 शेतकरी विरूद्ध किशोर बाळकृष्ण फोकमारे यांच्यात रस्त्याच्या प्रश्नावरून गेल्या काही महिन्यापासून वाद सुरू होता. या वादाचे गांभीर्य लक्षात घेऊन नायब तहसीलदार विकास सारंगधर राणे, मंडळ अधिकारी संजय साळवे आणि ग्राम महसूल अधिकारी संदीप ढोक यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन पाहणी केली.
निरीक्षणावेळी संबंधित शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले. दोन्ही पक्षांनी आपापले तोंडी युक्तिवाद मांडले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व बाजू काळजीपूर्वक ऐकून तातडीने योग्य तो निर्णय दिला आणि प्रकरण सामंजस्याने सोडवण्यात आले. या घटनेमुळे गावातचे वातावरण उत्साहाचे झाले. अनेकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आज आपल्या गावातच न्यायालय भरले आणि ताबडतोब न्याय मिळाला.”
शेतकऱ्यांचा दिलासा –
पूर्वी अशा वादांसाठी कार्यालयांचे चकरा माराव्या लागायच्या, फाईल्स फिरायच्या, महिनोन्महिने वेळ लागत असे. मात्र, आज महसूल विभागाने गावातच येऊन प्रश्न निकाली काढल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दिलासा मिळाला आहे. तत्काळ निर्णय झाल्यामुळे शेतीकामात कुठलाही अडथळा न येता शेत मशागतीचे नियोजन निर्विघ्नपणे होऊ शकेल, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर उपक्रम –
ही संपूर्ण कारवाई छत्रपती शिवाजी महाराज अभियानांतर्गत सुरू असलेल्या सेवा पंधरवडा मोहिमेचा एक भाग म्हणून करण्यात आली. 17 सप्टेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, नागरिकांच्या प्रश्नांचे त्वरित व गावातच निराकरण करण्याचा उद्देश आहे.
सदर मोहिमेअंतर्गत माननीय उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय पथकाने वेगवान हालचाल करून वाद मिटवला.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद –
गावकऱ्यांनी या कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले. “गावातच अधिकाऱ्यांनी येऊन तंटा मिटवल्यामुळे न्याय मिळण्याबरोबरच गावातील सलोखाही टिकून राहिला. त्यामुळे न्यायालयांवरील भार कमी होईल आणि ग्रामविकासाची गती वाढेल,” अशा शब्दांत गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या कारवाईमुळे महसूल प्रशासनावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, अशा तंटामुक्त उपक्रमांमुळे ग्रामपातळीवर शांतता आणि ऐक्य वाढण्यास हातभार लागणार आहे.