तेल्हारा शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढा.
युवा सेनेची पालिकेकडे मागणी.

शहरामधील आरक्षणासह गुंठेवारीचा प्रश्न निकाली काढून घरकुलापासून वंचित असलेल्या गरिबांना घरकुल द्या व इंदिरा नगर मधील नागरिकांच्या घरांचा प्रश्न सोडवा अशी मागणी युवासेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आलीआहे.
तेल्हारा शहरामधील जिजामाता नगर, नाथनगर तसेच इतर भागातील आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून त्या भागातील नागरिकांना आपल्या हक्काच्या घराची, जागेची नोंद न.प.मध्ये करून त्यांचा प्रश्न मार्गी लावून सदर सर्व नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा तसेच ज्या भागांमध्ये पालिकेने गुंठेवारी व एन. ए. चा प्रश्न उपस्थित करून अनेक नागरिकांना पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यांना सदर योजनेचा लाभमिळविण्याकरिता यापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार गुंठेवारी भागातील घरे, मालमत्ता नियमित करण्यात याव्यात व एनएचा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा तसेच बॉण्ड पेपर मालमत्ता धारकांना सुद्धा घरकुल चा लाभ घेण्यात यावा , शहरातील गुंठेवारीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे तो तात्काळ सोडविण्यात यावा तसेच शहरातील इंदिरानगर मधील रहिवाशांना ते ज्या ठिकाणी राहतात त्या जागेच्या मालकी हक्क त्यांना देण्यात यावा अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर मागणीचा विचार लवकरात लवकर न केल्यास जनहितार्थ आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर युवा सेना जिल्हा प्रवक्ते प्रा .सचिन थाटे, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप सोनटक्के, तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, युवा सेना शहर प्रमुख गौरव धुळे, स्वप्नील सुरे, राम वाकोडे,मोहन श्रीवास, प्रदीप राजुस्कर, दिलीप गावंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.