महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत आता जिल्ह्यातील ३६ रूग्णालये समाविष्ट.
गरजूंवर विनामूल्य उपचार; रूग्णालयांना सहभागी होण्याचे आवाहन.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत
आता जिल्ह्यातील ३६ रूग्णालये समाविष्ट.
गरजूंवर विनामूल्य उपचार; रूग्णालयांना सहभागी होण्याचे आवाहन.

अकोला, दि. 2 : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील सहभागी रूग्णालयांची संख्या वाढली असून, आता ३६ रूग्णालयांत या योजनेखाली उपचार होऊ शकतील. गरजूंना 5 लाखांपर्यंतच्या विनामूल्य उपचाराची सुविधा योजनेमुळे झाली आहे, ३० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रूग्णालय आणि १० खाटांच्या एकल विशेष रूग्णालयांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे.
नागरिकांना दर्जेदार व परवडणा-या सुविधा उपलब्ध होण्यासाठी अधिकाधिक रूग्णालयांचा समावेश करण्यात येत आहे, असे योजनेच्या जिल्हा समन्वयक शीतल गावंडे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, या उपक्रमामुळे गरीब व गरजू रूग्णांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल व जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील. नागरिकांना आपल्या नजिकच्या रूग्णालयाची माहिती जीवनदायी पोर्टलवर मिळू शकेल.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निकषांची पूर्तता करणा-या रूग्णालयांचा योजनेत समावेश होतो. आधुनिक वैद्यकीय उपकरणे, उच्च दर्जाची रूग्णसेवा, प्रशिक्षित मनुष्यबळ असे निकष आहेत. रूग्णालयांनी जीवनदायी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा.
समाविष्ट रूग्णालये : अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, तसेच मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रूग्णालय याबरोबरच तेल्हारा, बाळापूर, अकोट, चतारी व बार्शिटाकळी येथील ग्रामीण रूग्णालये ही शासकीय रूग्णालये योजनेत समाविष्ट आहेत.
अकोला येथील सिटी हॉस्पिटल, डॉ. के. एस. पाटील हॉस्पिटल, मुरारका हॉस्पिटल, भागवतवाडी येथील माऊली हॉस्पिटल, न्यू ग्लोबल हॉस्पिटल, रिधोरा रस्त्यावरील रिलायन्स हॉस्पिटल, संत तुकाराम हॉस्पिटल, रामदासपेठेतील श्रीमती बी. एल. चांडक हॉस्पिटल, शुक्ला चिल्ड्रेन हॉस्पिटल, अकोट फैल येथील फातेमा नर्सिंग होम हुसैनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मेडिकेअर हॉस्पिटल, देशमुख मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, बिहाडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (तुरखेड), रावणकर हॉस्पिटल, विदर्भ हॉस्पिटल, ऑर्किड हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, उमरी रस्त्यावरील न्यू विठ्ठल हॉस्पिटल, सन्मित्र मानस व्यसनमुक्ती केंद्र या खासगी रूग्णालयांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, मूर्तिजापूर येथील केळकरवाडीतील ठाकरे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, समर्पण हॉस्पिटल, मेहेर ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, आधार चॅरिटेबल हॉस्पिटल, बाबन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अवघाते बालरूग्णालय, गोवर्धन बायस्कर हॉस्पिटल आणि अकोट येथील विठ्ठल हॉस्पिटल, श्री सिद्धीविनायक हॉस्पिटल आदींचा समावेश आहे.