गुरु करावा नाही कळावा लागतो.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे गुरू पोर्णिमा उद्बोधन.

श्रीगुरूंच्या कृपाछत्रा शिवाय राजकारणापासून तर , समाजकारणापर्यंत तसेच प्रपंचापासून परमार्थापर्यंत कुठल्याही क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांपासून तर , देवराज इंद्रापर्यंत कुणाला विजयप्राप्तीची व्यवस्थाच नाही. ती श्रीगुरूंची अदृश्य कृपा ही एखाद्या उंचच्या उंच इमारतीच्या पायातील दगडाप्रमाणे असते. अर्थात ती कुणालाही द्रुगोचर होत नाही परंतु आपल्या यशाची इमारत त्यांच्या कृपा रुपी मजबूत पायाशिवाय उभीच राहू शकत नाही. एकूणच श्रीगुरुच प्रत्येक साधकाच्या जीवनाचा भरभक्कम आधार असतात.म्हणूनच बरेच लोक ते ज्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यात विजय प्राप्ती करिता आपल्या योग्यते नुसार गुरु शोधण्याचा प्रयत्न करीत असतात. वास्तविक पाहता स्वतःची योग्यता सिद्ध झाल्याशिवाय योग्य श्रीगुरुची प्राप्ती होणे दुरापास्त असते. शिष्याची योग्यता सिद्ध झाल्यानंतर श्रीगुरुच त्याचा शोध घेत येऊन त्याला अनुग्रहित करीत असतात. म्हणून गुरुला शोधावे नाही तर , जाणावे लागते. गुरु करावा लागत नाही तर शिष्य व्हावे लागते किंबहुना गुरु करावा नाहीतर , कळावा लागतो असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्रीसंत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमा करिता बहुसंख्येने उपस्थित श्रीगुरुभक्तांशी अनौपचारिकरित्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून श्रीगुरु महात्म्य व कृपेसंदर्भात बोलत होते. ते पुढे म्हणाले की , श्रीगुरुंचा अनुग्रह हा वर म्हणजे सुपुत्र असुन, त्याचा जेव्हा साधना संपन्नतेच्या उपवरतेला प्राप्त झालेल्या जिज्ञासूच्या श्रद्धा रुपी सुकन्येशी शास्त्रोक्त पद्धतीने पाणीग्रहण सोहळा अर्थातच विवाह संपन्न होतो ; तेव्हा त्या नवदांपत्यांच्या उदरी कालांतराने परमार्थ नामक मुलाचा प्रसव नाम जन्म होत असतो. म्हणजेच हृदयस्थ शुद्ध पारमार्थिक ज्ञानाचा उदय होत असतो. पित्या शिवाय पुत्र प्राप्ती शक्य नसल्यामुळे परमार्थिक ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा नुसती श्रद्धा असून चालत नाही तर , त्याकरिता श्रीगुरूंचा अनुग्रह प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सद्गुणसाधूनही मार्गदर्शक न मिळणे हे मानवी जीवनाचे दुर्भाग्य तर ; योग्य श्रीगुरु प्राप्त होणे हे सद्भाग्याचे लक्षण आहे . तसेच त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वतःची जीवन व्यतीत करून आत्मोद्धाराचा मार्ग प्रशस्त करणे हे महद्भाग्य आणि ते ज्या मुक्कामाप्रत पोहोचले तिथपर्यंत कुठल्याही प्रतिबंधा शिवाय सुखरूप पोहोचणे हे साधकाच्या जीवनाचे अहोभाग्य होय. असे भाग्य मात्र पूर्वपुण्य फलोन्मुख झाल्याशिवाय प्राप्त होत नाही हे तितकेच खरे आहे. एखाद्याव्यक्तीने कुठल्याही गुरूंकडे न जाता घरच्या घरीच स्वबुद्धीकौशल्याने ग्रंथध्ययन करून कितीही मोठे पांडित्य प्राप्त केले तरी , महापुरुषांची प्रत्यक्ष सेवा व सत्संगाशिवाय त्याला शास्त्राचे रहस्य समजू शकत नाही. म्हणूनच तर भगवान श्री ज्ञानोबारायांनी निष्ठावंत वारकऱ्याची संध्या असणाऱ्या हरिपाठ नामक त्यांच्या छोट्याश्या ग्रंथामध्ये द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान l तया कैचे कीर्तन घडेल नामीं ll
द्वैत झाडून टाकण्याचे हें ज्ञान गुरूवाचून कसे होणार ? आणि ज्याला हे ज्ञान नाही त्याला हरिनामाचे कीर्तन तरी कसे घडणार ? तसेच ” गुरुविण अनुभव कैसा कळे ” भगवत्प्राप्तीमुळे होणारा जो निरतिशय सुखाचा अनुभव तो सद्गुरुवांचून कसा कळेल ? गुरुविण ज्ञान कसे मिळेल आणि अनुभव कसा कळेल हे प्रश्नार्थक चिन्हांतच ज्याअर्थी विचारतात त्याअर्थी त्या दोन्ही गोष्टी श्रीगुरुकृपे शिवाय प्राप्त होणे शक्यच नाहीत. तसेच कुठलेही ज्ञान हे अनुभवाविन बडबडच मानल्या जाते. त्यातही श्री गुरुकृपा प्रसादाने प्राप्त झालेले ते ज्ञान संप्रदायानुष्ठानाशिवाय टिकत नाही . किंवा महाभारतातील महारथी कर्णा प्रमाणे ऐन युद्धाच्या वेळेवर उपयोगाला सुद्धा येत नाही. म्हणूनच आजही सखोल अध्ययन केलेले तत्त्वज्ञान वेळेवर आठवत नसेल किंवा विस्मरणात गेले असेल तर , हा गुरुकृपेच्या अभावाचा परिणाम आहे याची जाणीव ज्याची त्याला नक्कीच होत असते. असे अनेक पौराणिक , ऐतिहासिक व अर्वाचीन काळातील उदाहरणे देऊन त्यांनी उपस्थितांचे शंकानिरसन केल्याचे तसेच उपरोक्त कार्यक्रम चातुर्मास्य महोत्सवातील प्रत्येक एकादशीला आयोजित होणार असल्याचे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.