विवाह सोहळ्यातील ‘दांगळो’ थांबवा – बाळासाहेब फोकमारे
मध्यस्थी मंडळाच्या सभेत विचार मंथन.
विवाह सोहळ्यातील ‘दांगळो’ थांबवा – बाळासाहेब फोकमारे
मध्यस्थी मंडळाच्या सभेत विचार मंथन.

दि.२१-
कौटुंबिक जीवनात विवाह समारंभ हा एक संस्मरणीय व पवित्र क्षण आहे परंतू अलिकडे लग्न सोहळ्यातील दांगळो बघता समाज मन व्यथित झाल्याशिवाय राहत नाही. विवाह एक संस्कार आहे याचे भान ठेवून. विवाह सोहळ्यातील पावित्र्य राखले जावे असे कळकळीचे आवाहन मध्यस्थी वधूवर सुचक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
मध्यस्थी मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सद्यस्थितीतील ‘लग्न समारंभातील दांगळो’ या विषयावर गंभीरतेने विचार मंथन करण्यात आले. त्या अंतर्गत प्रबोधनात्मक पत्रक जारी करून समाज मनातील उमटलेल्या व्यथा मांडल्या आहेत.
काही अपवाद वगळता कुठलेच लग्न मुहूर्तावर लागत नाही. निमंत्रितांना वेठीस धरण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. आहेर, हुंडा, गिफ्ट, रिटन गिफ्ट सारख्या वाईट प्रथा बंद होण्या ऐवजी नव्या नव्या स्वरुपात अद्याप सुरु आहेत. लग्नातील बेसुरातील ऑर्केस्ट्रा, कानठळ्या फुटतात की काय असा डीजे बॅडबाजांचा धुडगूस, प्रदुषण वाढविणारे फटाक्यांचे प्रकार व-हाड्यांना असह्य होत आहे. हे गैरप्रकार कधी थांबणार असा सवाल बाळासाहेब फोकमारे यांनी उपस्थित केला आहे.
लग्नातील श्रीमंतीचे प्रदर्शन अत्यंत केविलवाणे आहे. महागड्या निमंत्रण पत्रिका, आवाक्याबाहेर निमंत्रण, जेवणावळी वर खर्च करुनही जेवणाची व्यवस्था पाहून खरंच घर धन्याची किव करावीशी वाटते. त्यापेक्षा जेवढ्या पाहूण्याची उत्तम सोय करु शकू तेवढ्यानांच निमंत्रित कां करण्यात येत नाही हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. लग्नातील फोटोग्राफरच्या सापळ्यात सारे नियोजन ध्वस्त होते व वेळेचा अपव्यय त्रासदायक ठरतो आहे. भव्य दिव्य लग्न सोहळा करण्याचा हव्यासात स्वतःचे हसे करण्यात कुठला शहाणपणा आहे हेच कळत नाही.
लग्नातील सावळा गोंधळाने या विवाहातील संस्कार, पावित्र व गंभीरता आपण हरवून बसलो आहोत. हा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत वधू वर पक्षाने विचार विनिमय करून आदर्श वाटावा अशा विवाह सोहळा आयोजित करावा. ही काळाची गरज आहे असा सल्ला मध्यस्थी मंडळाने दिला आहे.