शिक्षेला दिक्षेची जोड असणे गरजेचे – ज्ञानीदासजी महात्यागी.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिर.
शिक्षेला दिक्षेची जोड असणे गरजेचे – ज्ञानीदासजी महात्यागी.
श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिर.

अयोध्येचे चक्रवर्ती सम्राट राजा दशकाचे चारही पुत्र कुलगुरू वशिष्ठ यांच्या आश्रमामध्ये दीक्षित होऊन शिक्षित होण्याकरिता गेले होते हा आपला इतिहास आहे. कारण शिक्षेचा संबंध मस्तिष्कासी तर शिक्षेचा सरळ हृदयाशी असतो. मस्तकातील ज्ञान वय वा कालपरत्वे विस्मरणात जाऊ शकते परंतु कोणतीही गोष्ट हृदयात कायमस्वरूपी घर करून राहत असते म्हणून शिक्षा आजन्म टिकावी असे वाटत असेल तर शिक्षेला दिक्षेची जोड असणे गरजेचे असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन स्वामी ज्ञानिदासजी महाराज महात्यागी तिरखेडी आश्रम गोंदिया यांनी केले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराच्या शुभारंभ प्रसन्न बोलत होते.
ते पुढे म्हणाले की ,आजकाल विद्यार्थ्यांना दीक्षित करणारी गुरुकुल परंपरा शासन स्तरावर मोडीत काढून कॉन्व्हेंट परंपरा आपल्यावर थोपल्यामुळे त्याचा बौद्धिक विकास तर झाला परंतु हृदय खूप कमजोर झाले आहे. त्यामुळे तो विज्ञानाच्या माध्यमातून मंगळ व चंद्रावर जाऊन पोहोचला किंबहुना तेथे सुद्धा जागा मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे . परंतु माय बापा करिता मात्र त्याच्या हृदयात जागा शिल्लक राहिलेली नसल्याने त्यांना तो निसंकोचपणे वृद्धाश्रमात नेऊन टाकतो आहे. याला आळा घालायचा असेल तर बालसंस्काराशिवाय पर्याय नाही. प्रथमदिनीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोनशेच्यावर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी त्यांचे व त्यांच्या मातापित्यांचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी भागवताचार्य शिवाजी महाराज टाले, गुणवंत महाराज ठोंबे , रामेश्वरजी महाराज , श्रीरामजी गवई , हरिदास वाघ आदी गणमान्य मंडळी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवताचार्य निलेश महाराज जाणे यांनी तर प्रास्ताविकासह प्रात्यक्षिक भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले . तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व पसायदानाने सांगता कार्तिक महाराज रोकडे यांनी केली . असे व्यवस्थापक ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.
