पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन.
ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी
पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन.
ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, १००० मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप आदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी सन २०२५-२६ मध्ये ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. अर्जदारांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी कोणतीही योजना निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. सन २०२१-२२ पासून लागू असलेली प्रतीक्षा यादी २०२५-२६ पर्यंत वैध आहे, त्यामुळे अर्जदारांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे. यादीतील क्रमांकानुसार लाभ मिळण्याचा अंदाजे कालावधी कळू शकल्याने अर्जदारांना नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
योजनांचा लाभ घेण्यासाठी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर अर्ज भरता येतील. तसेच AH-MAHABMS (Google Play Store वर उपलब्ध) या मोबाइल अॅपवरही अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा कालावधी २ जून २०२५ पर्यंत राहील. अधिक माहितीसाठी १९६२ या टोल फ्री क्रमांकावर सोमवार ते शनिवार, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत संपर्क साधावा.
अंतिम पात्रता यादी जाहीर करण्याचे वेळापत्रक
या योजनेसाठी मे २ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ३ ते ७ जून रोजी रँडमायझेशनद्वारे प्राथमिक निवड केली जाईल. ८ ते १५ जून २०२५ दरम्यान मागील वर्षी तसेच यावर्षीच्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा राहील. १६ ते २४ जून २०२५ दरम्यान पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रांची पडत्ळणी केली जाईल. २५ ते २७ जून २०२५ दरम्यान लाभार्थ्यांना कागदपत्रातील त्रुटी पूर्तता करावी लागेल. २८ ते ३० जून २०२५ दरम्यान कागदपत्रांची अंतिम पडताळणी केली जाईल. २ जुलै २०२५ रोजी अंतिम पात्रता यादी जाहीर केली जाईल.
अर्ज प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक
पशुसंवर्धन विभागाने अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून, कमीत कमी माहिती टाइप करावी लागेल आणि बहुतांश माहितीसाठी पर्याय निवडण्याची सुविधा आहे. अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविले जाणार असल्याने मोबाइल क्रमांक बदलू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
अर्जदारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग (पंचायत समिती, जिल्हा परिषद), तालुका पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किंवा उपआयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, योजनांची संपूर्ण माहिती आणि अर्ज पद्धती संकेतस्थळ व मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. पशुसंवर्धन विभागाने सर्व पात्र पशुपालकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आणि स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल टाकण्याचे आवाहन केले आहे.