बेलखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यातील महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न. जनतेची भर पावसात लक्षणीय उपस्थिती उत्स्फूर्त प्रतिसाद.
बेलखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यातील महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न. जनतेची भर पावसात लक्षणीय उपस्थिती उत्स्फूर्त प्रतिसाद.
बेलखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यातील महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न.
जनतेची भर पावसात लक्षणीय उपस्थिती उत्स्फूर्त प्रतिसाद.

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी श्री बेलेश्र्वर महादेव मंदिर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. दरम्यान भर पावसात जनतेची उपस्थिती लक्षणीय होती.

या भव्य शिबिराचे उद्घाटन अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांच्यासोबत अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोनारकर तसेच तेल्हारा तहसीलचे तहसीलदार समाधान सोनवणे, बेलेश्वर संस्थानचे अध्यक्ष गजानन उंबरकर, सरपंच रत्नाताई वरठे, उपसरपंच प्रफुल्ल उंबरकर मंचावर विराजमान होते.

या शिबिरात विविध शासकीय विभागांनी नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्याचे कार्य हाती घेतले. महसूल विभागामार्फत वारस झालेले सातबारे फेरफार करण्यात आले तर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना योजनांच्या अनुदानाचे धनादेश वाटप, शेती उपयोगी ट्रॅक्टर व अवजारे वितरण यांसारखी उपयुक्त मदत करण्यात आली. आरोग्य विभागाकडून नागरिकांना आभा कार्डांचे वाटप झाले तर पंचायत समितीमार्फत घरकुल प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना देण्यात आली.
शिबिरामध्ये उमेद योजना, महिला बचत गट, घरकुल योजना यांसारख्या ग्रामीण भागाच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योजनांची माहिती नागरिकांना समजावून सांगण्यात आली. नोंदणी व मुद्रांक विभागाने त्यांच्या योजनांची माहिती देत जनजागृती केली.
नायब तहसीलदार विकास राणे यांनी महसूल विभागाच्या योजनांचे महत्त्व अधोरेखित करून नागरिकांना त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले. पंचायत समिती गटविकास अधिकारी बांगर साहेब, मनरेगा चे संदीप झाडोकार व प्रतिनिधींनी महिला सक्षमीकरण, बचत गटांच्या माध्यमातून होणारा आर्थिक विकास आणि ग्रामीण प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले.
तहसीलदार समाधान सोनवणे यांनी आपल्या भाषणातून शेतशिवारातील रस्ते मोकळे करण्याचे महत्त्व पटवून सांगत नागरिकांनी सामूहिक सहभागातून गावाच्या प्रगतीत हातभार लावावा असे आवाहन केले.
विशेष म्हणजे, राष्ट्रनेते मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनी 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत चालणारा सेवा पंधरवडा हा लोकाभिमुख उपक्रम ग्रामीण भागात जनतेच्या दारी सेवा पोहोचविण्याचे माध्यम ठरत आहे.
या शिबिराला मोठ्या संख्येने नागरिक, शेतकरी, महिला बचत गट सदस्य, विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने शिबिरात सहभाग नोंदवला आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
बेलखेड येथील हे महाराजस्व समाधान शिबिर हा जनतेच्या उत्स्फूर्त सहभागाचा व शासनाच्या लोकाभिमुख कार्याचा उत्कृष्ट संगम ठरला. संपूर्ण महसूल, पंचायत टिम तसेच बेलखेड मंडळ अधिकारी संजय साळवे,ग्राम महसूल संदीप ढोक, ग्राम विकास अधिकारी बेलखेड व सहकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित मान्यवर व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.