तापत्या उन्हामुळे शीतपेय यांची मागणी वाढू लागली!
चौका चौकात रसवंती च्या घुंगरांचा आवाज.
तेल्हारा – दि.१८
माहे फेब्रुवारी व मार्च महिन्यापासूनच खऱ्या अर्थाने उन्हाळ्यात सुरुवात झाली त्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच सूर्य आग ओकायला लागला आहे तेल्हारा येथील पारा ३५ अंश पार करीत आहे. सध्या तापमान कमालीचे वाढत असून पहाटेची थंडगार वाऱ्याची झुळूक आणि दुपारी कडकउन्हामुळे उकाडा वाढला आहे. वाढता उष्मा पाहता शरीराला थंडावा देण्यासाठी लोक थंडपेयांकडे वळू लागले आहेत. सद्यस्थितीत सकाळ आणि रात्री वातावरणात गारवा जाणवत असला तरी दुपारी मात्र कमालीचा उकाडा जाणवत आहे. मात्र, सकाळी नागरिकांची चहाला पसंती मिळत असली तरी दुपारच्या कडक उन्हात शीतपेय व उसाचा रस पिणे नागरिक पसंत करतात. उसाचा रस हा शरीरातील साखर नियंत्रित ठेवत असल्याने हा रस घेण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे. अंगाला थंडावा देण्यासाठी बहुतांश नागरिक उसाचा रस पितात. त्यामुळे तेल्हारा शहरातील गल्लोगल्ली रसवंतीच्या गाड्या दिसू लागल्या आहेत. उष्णता वाढत असल्याने तेल्हारा बसस्थानक, महाराजा अग्रसेन टॉवर चौक, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर, आठवडी बाजार, महात्मा फुले चौक येथे आईस्क्रीमची तसेच थंड पेयाची दुकाने थाटलेली दिसत आहेत. सर्व प्रकारच्या शीतपेयांच्या दुकानांमध्ये व फिरत्या गाड्यांवर गर्दी दिसून येत आहे.
