आपला जिल्हा

कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक.

बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार.

कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक.
बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा – जिल्हाधिकारी अजित कुंभार.

अकोला, दि. २४ : खरीपासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यासाठी दर, साठा आदी सर्व बाबींचे सुस्पष्ट फलक, उन्हाळा लक्षात घेऊन विक्री केंद्रांवर सावली, पेयजल आदी सुविधा असाव्यात. भरारी पथकांनी कठोर निगराणी ठेवावी. शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी महेंद्र साल्के यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता असावी. त्याचप्रमाणे, कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी होता कामा नये. दुकानांवर निविष्ठांचे दर, उपलब्ध साठा आदी माहितीचे सुस्पष्ट फलक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, वाढते ऊन पाहता सावलीची व्यवस्था, पेयजल, सीसीटीव्ही आदी सुविधा असाव्यात. शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. विक्री केंद्रांनी फलक व इतर सुविधा उपलब्ध ठेवल्या किंवा कसे, याबाबत कृषी सहायकांच्या माध्यमातून तपासणी करून सात दिवसांत अहवाल देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
भरारी पथकांनी सुरुवातीपासूनच सजग राहून कार्यवाही करावी. कपाशीच्या बियाण्यात जिल्ह्यात अजित सीड्स वाणाच्या मागणीनुसार साडेतीन लाख पाकिटांची उपलब्धता ठेवावी. खते, बियाणे विक्रीत इतर उत्पादन लिंकिंग करू नये. एका उत्पादनाबरोबर दुसरे उत्पादन घेण्याची बळजबरी करू नये. नियमभंग करणा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. किरवे यांनी खरीपासाठी कृषी निविष्ठांचे नियोजन सादर केले. त्यानुसार जिल्ह्यात २०२५ मध्ये खरीपाचे ४ लक्ष ४२ हजार ८०० हे. पेरणी क्षेत्र प्रस्तावित आहे. कापसाचे संभाव्य क्षेत्रफळ १ लक्ष २७ हजार ३०० हे. असून, सुमारे ६ लक्ष ३६ हजार ५०० पाकिटांची मागणी आहे. मूग. उडीद, सोयाबीन, कपाशी अशी सर्व पीके मिळून ७० हजार ४३४ क्विं. बियाण्याची मागणी आहे. सोयाबीनच्या विविध वाणांच्या ९८ हजार ५०० क्विं. बियाण्याचे नियोजन आहे. खतांचे खरीप २०२५ साठी अंदाजे मागणी ९३ हजार १०० मे. टन असून, मंजूर आवंटन ९३ हजार ७९६ मे. टन आहे. जिल्ह्यात सर्वत्र बियाणे, खतांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!