बाल संस्कार हे योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ,श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड.
बाल संस्कार हे योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय.
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ,श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड.

मानवी जीवन हे संस्कारक्षम असून,त्याला योग्य दिशा मिळण्याकरिता एका सुयोग्य मार्गदर्शकाची नितांत गरज असते. तो मिळावा म्हणूनच अनेक जण आजन्म त्याचा शोध घेत असतात परंतु त्यांच्या पदरी सदैव निराशाच पडत असते. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मुळातच शोधण्याची चुकलेली पद्धत होय. योग्य दिशेने पाऊल टाकल्यानंतर मार्गदर्शक शोधावा लागत नसून तो मिळतच असतो. बालसंस्कार हे उच्च ध्येयाप्रत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय असे अनुभवपूर्ण मत भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडवा नामक मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने बहुसंख्येने दर्शनाकरिता आलेल्या पालक व बालक यांच्याशी अनौपचारिक रित्या सुसंवाद साधत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की , जे पालक स्वतःच्या बालकांना जागतिक स्पर्धेत टिकण्याच्या नावाखाली त्याला त्यांच्या संस्काररूपी न्याय हक्कापासून वंचित करीतात ते स्वतःच स्वतःच्या हाताने वृद्धाश्रमाचे आरक्षण निश्चित करीत असतात. भारतासारख्या संस्कृतीनिष्ठ देशांमध्ये अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम निर्माण होणे हे फार मोठी शोकांतिका असून , या समस्येवर वेळीच मात करायची असेल तर बालसंस्काराशिवाय दुसरा योग्य पर्याय नाही. भारतीय संस्कृती ही वर्णाश्रमानी युक्त असून ; ब्रह्मचारी व गृहस्थ या दोन आश्रमांचे नियम योग्य पद्धतीने न पाळल्या गेल्यामुळे त्यातून अनाथाश्रम तर, वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांची नियमावली न सांभाळल्याने त्यातून वृद्धाश्रम निर्माण होऊन आज रोजी आश्रम संख्या चार वरून सहा झाल्याचे निदर्शनास येते. म्हणून आपली संतती ही म्हातारपणात आपल्या संतापाची नाही तर , सांभाळण्याची व्यवस्था व्हावी असे वाटत असणाऱ्या सुज्ञ मातापित्यांनी प्रत्येक बालकाला बालपणीच संस्काराचे बाळकडू पाजून त्याला न चुकता संस्कृतीच्या शक्तीवर्धक जन्म घुट्टीची मात्रा दिली पाहिजे. तरच तो म्हातारपणात आपल्या आज्ञेचे पालन व आपले पोषण करेल.
त्याकरिता शुभस्य शिघ्रम् या न्यायाने या शुभकार्याचा तात्काळ शुभारंभ करून येत्या १ मे ते २० मे २०२५ पर्यंत श्री ज्ञानेश आश्रम येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरामध्ये आपल्या पाल्यांना पाठविले पाहिजे . तसेच या कार्याकरिता तन-मन-धनाने सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन सुद्धा महाराजांनी यावेळी उपस्थितांना केले,असे शिबिर व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.