महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती पारदर्शक सेवेचे उत्तरदायित्व जाणून कार्य करा.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे प्रतिपादन.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपूर्ती
पारदर्शक सेवेचे उत्तरदायित्व जाणून कार्य करा.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे प्रतिपादन.

अकोला, दि. २८ : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि शासकीय कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा कायदा आहे. त्यानुसार प्रत्येक यंत्रणेने नागरिकांना वेळेत आणि पारदर्शकपणे सेवा देण्याचे आपले उत्तरदायित्व जाणून कार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन कार्यक्रम नियोजनभवनात झाला, त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, निखिल खेमनार, अनिरुद्ध बक्षी, प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंह पवार यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ता, नागरिक यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि वेळेत लोकसेवा पुरवणे आणि सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे हे कायद्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचा-यांनी कार्य करावे. प्रत्येक काम विहित कालमर्यादेत पूर्ण व्हावे. नागरिकांना आवश्यक माहिती व सेवा वेळेत मिळावी.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या हस्ते कायद्यानुसार अधिसूचित सेवांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यालयातील 90 टक्क्यांहून जास्त प्रकरणांमध्ये विहित वेळेत सेवा पुरविणा-या अकोट उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, बाळापूरचे अनिरूद्ध बक्षी, अकोला, बार्शिटाकळी व मूर्तिजापूर तहसीलदार यांना प्रशस्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. लोकसेवा हक्क कायद्याची माहिती देणारे पथनाट्य कर्मचाऱ्यांनी सादर केले. कायद्याचे परिपूर्ण पालन करण्याविषयी प्रतिज्ञाही यावेळी घेण्यात आली