‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात कार्यशाळा.,सार्वजनिक आरोग्य संवर्धनासाठी अभियानाद्वारे महत्वाचे कार्य – खासदार अनुप धोत्रे
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात कार्यशाळा.,सार्वजनिक आरोग्य संवर्धनासाठी अभियानाद्वारे महत्वाचे कार्य - खासदार अनुप धोत्रे
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानात कार्यशाळा.,सार्वजनिक आरोग्य संवर्धनासाठी अभियानाद्वारे महत्वाचे कार्य – खासदार अनुप धोत्रे

अकोला, दि. १२ : निरामय आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता, पोषण आणि जनजागृती यांचा समन्वय साधत गावोगावी आरोग्यक्रांती घडवण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे व्यक्त केला.
‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन खासदार श्री. धोत्रे यांच्या हस्ते जि. प. कर्मचारीभवन संविधान सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आरती कुलवाल,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सध्या ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि १७६ आरोग्य उपकेंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण रुग्णालये व सामुदायिक आरोग्य केंद्रांमार्फत नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे. या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून गावपातळीवर विविध आरोग्य उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ५३४ ग्रामपंचायतींनी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.

श्री. धोत्रे म्हणाले की, ग्रामीण महाराष्ट्राच्या आरोग्यचित्रात आमूलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने या अभियानाची सुरुवात केली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गावे या अभियानात सहभागी होणार असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी उभारी मिळणार आहे.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा व ग्रामपातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. गावपातळीवरील समित्या आरोग्य निर्देशांकांचे मूल्यमापन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीस दिशा देतील.
तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक गावाचे स्वच्छता, लसीकरण, मातृ-शिशु आरोग्य, कुपोषण निर्मूलन, पाणी गुणवत्ता व रोगनियंत्रण या निकषांवर मूल्यमापन करण्यात येणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून सन्मानित करण्यात येणार असून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.