आपला जिल्हा अकोलाआपला जिल्हा बुलढाणाधार्मिक

विदर्भ भूमीच्या कुशीतील दैदिप्यमान ज्ञान सूर्य :- श्रीसंत श्रीराम महाराज .

विदर्भ भूमीच्या कुशीतील दैदिप्यमान ज्ञान सूर्य :- श्रीसंत श्रीराम महाराज .

विदर्भ भूमीच्या कुशीतील दैदिप्यमान ज्ञान सूर्य :- श्रीसंत श्रीराम महाराज .

          वैज्ञानिक प्रगतीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा विपरीत कार्यकरीता उपयोग करून ; विषयांधतेने अज्ञानाच्या खोल गर्दीत पडू पाहणाऱ्या व सत्य स्वरूप मार्गातून भरकटून आडरानामध्ये शिरणाऱ्यांना गुरुकृपेच्या छत्रछायेत सन्मार्गाचा प्रकाश दाखविण्यासाठी आदिशक्ती मुक्ताई व संतश्री सखाराम महाराजांच्या कृपांकित असणाऱ्या कोकाटे परिवारात मातोश्री चंद्रभागादेवी अवधूतजी पाटील या श्रद्धा व विश्वासरुपी भगवद्भक्त दांपत्याच्या उदरी स्वातंत्र्यपूर्व काळात २९.१०.१९२६ रोजी पहाटे ४.४५ वाजता वरूळ ( गव्हाण ) नामक छोट्याशा खेडेगावात या अवनीतलावर अवतीर्ण झालेला विदर्भभूमीच्या कुशीतील दैदिप्यमान ज्ञानसूर्य श्रीसंत श्रीराम महाराज मेहुणकर हे होत. त्यांच्या अवतिर्णोत्सव शताब्दीवर्ष म्हणून १६ ते २३ .४.२०२६ पर्यंत श्री स्वयंभू महादेव मंदिर अंत्रि ( मलकापूर ) येथे संपन्न होत असणाऱ्या भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह निमित्ताने थोडे तात्विक चिंतन.

        वर्षत सकळ मंगळीं l ईश्वरनिष्ठांची मांदियाळी l अनवरत भूमंडळी l भेटतु भूतां ll संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठांचे समुदाय भूतलावरील सर्व जीवमात्रांना निरंतर भेटो . या विश्व माऊली भगवान श्री ज्ञानराजांनी विश्वात्मक स्वरूप असणाऱ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांना यावद् भूतलावरील सर्व जडजीवांच्या उद्धाराकरिता निर्माण केलेल्या जगत् मान्य अद्वितीय स्वरूप ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पसादानरूपी प्रसादाच्या मागणी नंतर श्रीगुरुरायांनी संतुष्टतापूर्वक दिलेल्या दानामुळेच तेव्हापासून तर आजतागायत अनेकानेक संतांच्या मांदियाळीची अखंड स्वरूप परंपरा या पवित्रतम् भारतखंडांमध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यातही प्रामुख्याने विदर्भात अवतिर्ण होत आली आहे. आणि होत राहणार यात तिळमात्र शंका नाही. त्यातच नैष्टिक बालब्रह्मचर्याचे निष्कलंक तेज , नि:स्पृहतेच्या माध्यमातून चेहऱ्यावर झळकणारा अनवरत आनंद , श्रीगुरु बंकट स्वामी महाराज यांच्या चरण सानिध्यात संपूर्ण वैदिक वेदोपनिषदादि ग्रंथांच्या व संत वाङ्मयाच्या तसेच रामायण व महाभारतादि ग्रंथ व भारतीय इतिहासाच्या सांङ्गोपांग संशोधनात्मक अध्ययनातून निर्माण झालेले तत्त्वज्ञानाचे प्रभावी वलय , हे संत विचार विश्वव्यापी होण्यास व ते सर्व स्तरातील व्यक्तींच्या मनावर खोलवर रुजवून त्याचे हृदय परिवर्तन करण्यासाठी आयुष्यभर असणारी अविश्रांत धडपड करणारे तसेच अखिल विश्वात साम्राज्यवादापोटी निर्माण झालेल्या अशांतीचे काहूर मिटवून ; शांतीचे एकछत्रसाम्राज्य निर्माण होण्याकरिता असलेली अखंड तळमळ , सुज्ञ व अज्ञ समाजोद्धारार्थ विशाल असणारे मातृहृय , धर्म व धर्म क्षेत्र रक्षणार्थ असणारी अजोड कळकळ, किंबहुना धर्मावर होत असणारे आक्रमण व धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण परतविण्यासाठी केलेला संघर्ष ,संत व शास्त्र विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी असणारी अखंड धडपड ,त्यात देह दुःखाचा तिळमात्रही विचार न करता कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून तहयात समाज प्रबोधन करणारे तापरहीत अलौकिक ज्ञानसूर्य श्रीसंत श्रीराम महाराज हे होते.

       तरी मऊपणें बुबुळें l झगडतांही परी नाडळे l येरवीं फोडी कोंराळे l पाणी जैसें ll तैसें तोडावया संदेह l तिख जैसें कां लोह l श्राव्यत्वें तरी माधुर्य l पायीं घाली ll उपरोक्त भगवान श्री ज्ञानेश्यांच्या वचनानुसार जसे पाणी शरीरातील सर्वात नाजूक असणाऱ्या बुबुडाला घासले तरी ते मऊपणामुळे डोळ्यांमध्ये खूपत नाही ; पण त्याच पाण्यासंबंधी विचार करून पाहिले तर ज्याप्रमाणे तेच पाणी डोंगराचा कडा फोडते .अगदी त्याचप्रमाणे ज्यांचे सत्य भाषण हे साधकांचा संशय नाहीसा करण्याच्या कामात तलवारी प्रमाणे तीक्ष्ण होते . आणि ऐकण्याच्या बाबतीत गोडपणालाही पायी तुडविणारे होते . ज्यांचे सत्य भाषण सहज ऐकत असतांना जणू काही कानालाच मुख उत्पन्न होत असायचे . अर्थातच तेच ते पुन्हा पुन्हा ऐकावे अशी कानाला इच्छा उत्पन्न होत होती . आणि जे सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जात होते . अर्थातच श्रोत्यांना ब्रम्हाचा साक्षात्कार करून देत होते . आणि विशेष म्हणजे त्यांचे ते प्रिय भाषण कुणालाही फसवण्याकरीता नव्हते . त्यातही जरी ते खरे असले तरी ; ते कोणालाही कधीही खूपत नव्हते . कारण त्यांची वाणी -अखंड नाम चिंतनाने ओजस्वी , चेहरा – ब्रह्मचर्याने तेजस्वी आणि शरीर – खडतर साधनेने तपस्वी होते. तसेच ज्यांच्या प्रत्येक शब्दात – चमत्कार नाहीतर परिवर्तन घडविणारी चमत्कृती , व्यवहारात – निस्पृहतेमुळे आलेली अनासक्ती आणि जीवनभर – ईश्वर भक्ती ही त्रिसूत्री होती. ज्यांच्या अंतःकरणांमध्ये भवसागरात बुडणाऱ्या विषयीची – अंत:करणपूर्वक हळहळ , समाजाची – कमालीची कळकळ व सर्वांच्या उद्धाराची अखंड – तळमळ होती.जे वृत्तीने – शौर्यसह धैर्यवान , बुद्धीने -विवेकाधीष्टीत विद्वान आणि आचरणाने – मातृवत् पर दारेषु असे चारित्रवान होते . जे स्वभावाने – शिस्तप्रिय प्रेमळ , मनाने – सूर्यासारखे सोज्वळ आणि चित्ताने – मेरू पर्वतासमान निश्चळ होते. जे प्रभुभाषी भाषा प्रभू असल्यामुळे ज्यांचे भाषेवर – प्रभुत्व होते . ज्यांच्याकडे २२ वर्षात घडविलेल्या १०० कीर्तनकारासह सुज्ञ व अन्य समाजाचे – गुरुत्व असतांना सुद्धा ; ज्यांच्या आचरणात सदैव – वारकरी संत वाङ्मयाचे तत्त्वज्ञान पचवून निर्माण झालेले विनम्रतेचे लघुत्व होते. ज्यांचे व्यक्तिमत्त्व – चित्र ( फोटो) व चरित्रासह आकर्षक , व्यवहार – पथ व पारदर्शक व प्रबोधन – परमात्मा दर्शक होते. ज्यांच्या जीवनात समस्त मानव समाजा संबंधात सदैव – समत्व , भावनेत -मोहरहित ममत्व आणि वृत्तीत – ज्ञानदानाचे दातृत्व होते. ज्यांचे जीवन – सर्वांनुकरणीय , कार्य -शेकडो मंदिरांचा जिर्णोद्धार केल्याने तसेच वारकरी संप्रदाय रुपी इमारतीचे कळस असणाऱ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन स्थळावरी मंदिराच्या १९७७ ला केलेल्या कलश स्थापनेमुळे अतुलनीय व कृती – बाल संस्कार शिबिर , आळंदी,पंढरपूर ,मुक्ताईनगर त्र्यंबकेश्वर आदि ठिकाणी पायी वारीची परंपरा निर्माण केल्याने आचरणीय होती . ज्यांच्या मनगटात – प्रापंचिक व पारमार्थिक पहिलवानांना चित पट करण्याएवढे कर्तृत्व , हातात – देवगड , मेहूण सारख्या तब्बल चौदा संस्थानाचे नेतृत्व , तरीही वृत्तीत अखंड -मुक्ताई व सखाराम महाराजांच्या सेवेचा दास्यत्वाचाच भाव होता . तसेच ते प्रबोधनातून समाजाचे मन , मेंदू आणि मनगट मजबूत करणारे वस्ताद नाम पहिलवान होते. जे कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून देशीक , भाषिक व प्रादेशिक ऐक्य घडविणारे उत्कृष्ट संघटक होते. महाराष्ट्र अंतर्गत असणाऱ्या मराठवाडा, खान्देश ,कोकण आदि प्रभागांना जोडणारी ते उत्कृष्ट सेतूच होते. जे विद्वत्तेचावान अंगावर उमटले ले विवेकाधिष्टित विद्वत्तेचे धनी असणारे विद्वान होते. ज्यांच्या पोटात आणि ओठात एकच गोष्ट असलेले उत्कृष्ट प्रबोधनकार होते. नव्हे नव्हे श्रीसंत श्रीराम महाराज हे प्रबोधनातून परिवर्तन घडविणारे संप्रदायाचे प्रौढप्रतापी प्रवक्ता होते. त्यामुळेच वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू श्रीगुरु बंकट स्वामी महाराजांचा मठाचे मठाधिपती या नात्याने वारस हक्काने आलेल्या सर्व सेवा तसेच माऊलीचे मंदिर व सोहळ्यातील बरड, बीज उत्सवात शिळा मंदिर , पंढरपुरातील केशवराज मंदिरातील कीर्तन सेवा त्यांनी तहयात चालविल्या व तदनंतर वारसा हक्काने श्रीगुरु तुकाराम महाराज सखारामपुरकर हे चालू आहे.

आतां निर्वाळूनि कनकें l भरिला गांगे पीयुखे l तया कलशाचियासारखें l शौच असे ll जे अंगीं निष्काम आचारु l जीवीं विवेक साचारु l तो सबाह्य घडला आकारू l शुचित्वाचा ll सोने शुद्ध करून त्याची घागर बनविली व ती घागर अमृततुल्य गंगेच्या पाण्याने अथवा केवळ अमृताने भरली तर त्या बाह्यभ्यंतर शुद्ध घागरी सारखे जणू त्यांचे शौच होते. देहेंद्रियात निष्काम धर्माचा विचार आणि अंत:करणात आत्मानात्मविचार हे केवळ बोलण्यापुरतेच न राहता ज्यांच्या अंगी खरोखरच होते . ते बाहेरून मनुष्य आणि आतून शुचित्वाचा आकारच घडलेले होते‌. महाराजांनी उपरोक्त ज्ञानेश वचनांनुसार आजन्म जीवन जगून जगताच्या समोर एक आदर्श प्रस्थापित केला. किंबहुना भगवान श्री ज्ञानोबारायांनी सदर्हू ओव्या परम पूजनीय महाराजांकरीताच लिहिल्यात की काय असा भास सुज्ञवाचकांना झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास घडला त्यांना तर अशी अनुभूती होईल की ज्ञानोबारायांनी रेखाटलेल्या शब्दचित्राची महाराज जणू काही प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच होते. नव्हे नव्हे ते नित्यनेमाने नुसती ज्ञानेश्वरी वाचणारे किंवा सांगणारे नाही तर, ज्ञानेश्वरी कंठस्थ करून प्रत्यक्ष जगणारे चालते बोलते ज्ञानेश्वरीचे विद्यापीठ होते. त्यांच्या अवतिर्णोत्सव शताब्दी वर्षानिमित्त हे शब्द सुमन त्यांचे चरणी समर्पित.

भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. 

श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर.,श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ ता. तेल्हारा जि. अकोला .

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!